चक्रीवादळाने हिरावला पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

narayngoan
narayngoan

पुणे : चक्रीवादळाने पुणे जिल्ह्यातील चारा व भाजीपाला पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. तसेच, कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले. कोरोनामुळे संकटात आलेला बळीराजा त्यामुळे आणखी अडचणीत आला आहे. पाॅलीहाउसचे नुकसान मोठे आहे. 

जुन्नर तालुका
नारायणगाव :
वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे जुन्नर तालुक्यातील फळ, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले. आज दुपारी चारनंतर पूर्व बाजुकडून पश्चिम बाजूकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा  सरासरी वेग ताशी सत्तर किलोमीटर होता. चक्री वादळाच्या तडाख्याने प्रामुख्याने आंबा, डाळिंब, सीताफळ, पपई या फळ झाडांची फळे व फुले गळून, झाडांच्या फांद्या तुटून व भाजीपाला पिके भुईसपाट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे हंगाम वाया गेला असून, शेतकरी संकटग्रस्त झाला आहे. येथील कृषी विज्ञान केंद्रांतील हवामान केंद्रात ताशी सरासरी ७० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची नोंद झाली.चक्री वादळाच्या तडाख्याने आंबा, डाळिंब, सीताफळ, पपई या झाडांची फळे व फुले गळुन पडली. मिरची, टोमॅटो, वेलवर्गीय भाजीपाला व उन्हाळी बाजरीचे पिक भुईमूसपाट झाले. शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या, मल्चिंग कागद व गोठ्याचे पत्रे उडुन गेले.येणेर,आपटाळे, उच्छिल,तांबे,कुसुर या भागांत फळे गळून, फांद्या तुटून आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  
आपटाळे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील काले, येणेरे, सुराळे, धालेवाडी, बेलसर या ठिकाणी आंब्याचे
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन तोडणीच्या अवस्थेत आंबा आल्याने आंबा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वादळी पावसाने आंबा उत्पादकांचे आर्थिक नियोजन अक्षरशः कोलमडून टाकले आहे. निरगुडे येथे बाजरीचे उभे पीक भुईसपाट झाल्याने बाजरी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. कांदाचाळीचे कौले उडून गेल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या घटना काले, दातखीळवाडीमध्ये घडल्या आहेत. 
 
पुरंदर तालुका
गराडे :
पुरंदर तालुक्यात आज सकाळपासुन पावसाने हजेरी लावली आहे. वादळामुळे तालुक्यातील सीताफळ बागेची मोठ्या प्रमाणावर फुल गळती होऊन मोठे नुकसान होणार आहे. तालुक्यात गराडे, भिवडी, हिवरे, दिवे, काळेवाडी, पवारवाडी, जाधवाडी, झेंडेवाडी, सोनोरी, वाघापूर, गुरोळी, आंबोडी, वनपुरी, उदाचीवाडी,
पिंपळे, बोऱ्हाळवाडी, सुपे खुर्द आदी परिसरात सीताफळाची लागवड चांगल्या प्रमाणात आहे. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आंबा फळे जमीनीवर पडलीत.  
खळद : परिसरामध्ये गेले दोन दिवसा पासून सुरु असणारा मुसळधार पाऊस व वादळी वारा यामुळे उभी पिके भुईसपाट होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील ऊस, कांदा, सिताफळ, डाळिंब, आंबा
यासारख्या फळबागा, तर कडवळ, मका, गवत, वैरण या जनावरांच्या चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
झाले. वार्‍यामुळे ऊस पूर्णपणे भुईसपाट झाला आहे, बाजारभावाअभावी असंख्य शेतकऱ्यांनी काढलेला कांदा शेतामध्ये ठेवला आहे, याचेही नुकसान झाले. काही ठिकाणी काढणी योग्य कांदाही सडू लागला आहे. सीताफळाची फुले, डाळिंबाची फळे, आंब्याची फळे गळाली.

खेड तालुका
चाकण : चाकण व परिसरात काल  रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसाने व जोराच्या वाऱ्याने शेतातील पिके
जमिनीवर पडली आहेत. बाजरी, मका, भुईमूग,गवार, वांगी, हिरव्या मिरच्या आदी पिकांचे  मोठे नुकसान
झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. शेतात पाणी साचले आहे. शेतातील कामे मात्र आज पूर्णपणे ठप्प होती.  

हवेली तालुका
खेड शिवापूर :
परिसरात बुधवारी दिवसभर जोरदार वादळ आणि संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे परिसरातील शेतपिकांचे आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. या परिसरात बुधवारी दिवसभर वादळ आणि पाऊस सुरू होता. त्याचा फटका या भागातील शेतपिकांना बसला. अनेक शेतकऱ्यांची पिके व आंबा फळाचे मोठे नुकसान झाले.

आंबेगाव तालुका
घोडेगाव  : घोडेगाव, नारोडी, गिरवली परिसरात सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातही बराकीत साठवलेला कांदा, झाडावरील आंबे व शेतात उभी असलेली बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याचा पावसाचा जोर असल्याने गिरवली, अमोंडी, कोलदरे या भागातील आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. जवळजवळ ४० टक्केहुन अधिक आंबे जमिनीवर पडले.           महाळूंगे पडवळ : कळंब येथे वाडयावस्त्यांवरील रस्ते बंद झाल्याने रात्रीचे दुधाचे संकलन बंद ठेवण्याचा निर्णय
खासगी दुध संकलन केंद्र चालकांनी घेतला आहे. लौकी, चांडोली बुद्रुक, महाळुंगे पडवळ, साकोरे, चास,
ठाकरवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर काढणी करून ठेवलेला कांदा, बाजरी कणसांवर झाकण
टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.

जुन्नरचा हापूस मातीमोल                  नारायणगाव : चव, रंग, वास या साठी जुन्नरच्या हापूसचा देश व परदेशात नावलौकिक आहे. जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागांतील पारुंडे, वडज, आपटाळे, कुसुर, येणेरे आदि भागांत हापूस, केशर, राजपुरी या जातीच्या आंब्याचा बागा आहेत. जून महिन्यात या आंब्याचा तोडणी हंगाम सुरू होतो. शेतकरी आंबा तोडणीच्या तयारीत असताना आज झालेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा काही क्षणात चुराडा झाला. शेकडो एकर क्षेत्रातील आंबे गळुन पडले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा तोंडातील घास वादळाने हिरावून नेला.

वीज पुरवाठ सुरळीत करण्याचे प्रयत्न
मंचर : 
आंबेगाव व जुन्नर तालुक्यात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसल्याने खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू होण्यासाठी राज्यातून महावितरणचे अधिकारी, जन मित्रपथके व कंत्राटदारांचे कुशल कामगार दाखल होणार आहेत. याबाबत कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत व राज्याचे महावितरण कंपनीचे तांत्रिक विभागाचे संचालक साबू यांच्याबरोबर चर्चा केली आहे. युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने महावितरण कंपनीने नियोजन सुरू केले आहे. सद्यस्थितीत या दोन तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी किमान  सहा ते सात दिवस लागतील. गुरुवारी सकाळीच वीजवाहिन्या, विजेचे खांब रोहित्र, विजेची उपकरणे व अन्य भागातून अभियंते जनमित्र आंबेगाव जुन्नर भागात येणार आहेत. त्यांच्यासाठी गाड्या, जेवण व नाश्ता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गोवर्धन दूध प्रकल्प, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, शरद बँक आदी संस्थांनी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली.

अमोल कोल्हे यांची मागणी                             पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात झालेल्या शेती व मालमत्तेच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. जुन्नर-आंबेगाव आणि खेडचे प्रांत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा डॉ. कोल्हे यांनी घेतला.डॉ. कोल्हे म्हणाले कोरोनाच्या संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.लागोपाठच्या या संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे.उद्या संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही डॉ. कोल्हे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com