'तोक्ते' चक्रीवादळाचा लोणावळ्याला फटका, ८ मिमी पावसाची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyclone Tauktae 8 mm of rain recorded Lonavala

'तोक्ते' चक्रीवादळाचा लोणावळ्याला फटका, ८ मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा परिसरास 'तोक्ते' चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला. गेले दोन दिवस सोसाट्याचा वारा आणि पावसाने लोणावळेकरांची तारांबळ उडाली. दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने लोणावळ्यात सोमवारी ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावर कुमार रिसॉर्टसमोर मध्यरात्रीच्या सुमारास झाड कोसळले. सुदैवाने कसलीही जीवित व वित्तहानी झाली नाही.

हेही वाचा: ''फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना महाविकास आघाडीने काळीमा फासला''

पुणे- मुंबई महामार्गावर फारशी वर्दळ नसल्याने वाहतुकीवर परिणाम झाला नाही. लोणावळा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा महामार्गावर पडलेले झाड बाजूला बाजूला केले. 'तोक्ते' चक्रीवादळाचा अलर्ट जाहीर झाल्याने नगरपरिषद प्रशासन व महावितरणच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात आली होती. बाजारपेठ, गवळीवाडा येथे वीज वाहक तारा तुटल्याने काही भागातील वीज पुरवठा विस्कळित झाला.

गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. अनेक नागरिकाच्या पावसाळ्यापूर्वीची दुरुस्ती बाकी असल्याने पावसाचे आगमन होताच पावसापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र होते.

हेही वाचा: पुणे : दहा महिन्यांच्या वेदिकाला उपचारांसाठी १६ कोटींचा खर्च!

लोणावळ्यासह कार्ला, कुसगाव बु, वेहेरगाव, मळवली, भाजे, कुसगाव, औंढे परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकाची धावपळ उडाली. काही ठिकाणी विजेचे खांब व वृक्ष उन्मळून पडले.

हेही वाचा: Cyclone Tauktae : मुंबईवर परिणाम, जुन्नर मध्ये इशारा