खानदेशात दादर ज्वारीचे दर स्थिर

खानदेशात दादर ज्वारीचे दर स्थिर
Published on

खानदेशात दादर ज्वारीचे दर स्थिर
--
कडब्यालाही चांगली मागणी
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशातील प्रमुख रब्बी पीक असलेल्या दादर ज्वारीचे दर यंदा स्थिर राहिले आहेत. सध्या दादर ज्वारीला सरासरी ३८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून कडबा किंवा चाऱ्यालाही चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.

दादर ज्वारी हे खानदेशातील हुकमी पीक मानले जाते. यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली होती. खानदेशात सुमारे २८ हजार हेक्टरवर दादर ज्वारीचे पीक होते. त्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र राहिले.

दिवाळीनंतर कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी वेगाने झाली. तापी, गिरणा, पांझरा, अनेर, बोरी आणि सुसरी नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. या पिकासाठी फवारणी, खत किंवा इतर खर्च कमी असल्याने अनेक शेतकरी दादर ज्वारीकडे वळतात. तसेच या पिकातून दर्जेदार कडबाही उपलब्ध होत असल्याने पशुपालकांकडून त्याला मागणी असते.

जमिनीत पुरेसा वाफसा टिकून राहिल्याने पिकाची वाढ चांगली झाली. निसवणही समाधानकारक झाली. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मळणी पूर्ण झाली. बहुतांश शेतकऱ्यांना एकरी १० ते ११ क्विंटल उत्पादन मिळाले. काही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांची लागवड केली होती. त्यांना एकरी १४ क्विंटलांपर्यंत उत्पादन मिळाल्याची माहिती आहे.

हंगामाच्या सुरुवातीला दादर ज्वारीला प्रतिक्विंटल ४८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मार्चच्या मध्यापासून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जळगाव बाजार समितीत दररोज सरासरी तीन हजार क्विंटल आवक झाली होती. अमळनेर, चोपडा आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर बाजार समितीतही चांगली आवक झाली होती.

एप्रिलअखेरपासून आवक घटली

एप्रिलअखेरपासून बाजारातील आवक कमी होऊ लागली. बहुतांश शेतकऱ्यांकडे साठा संपल्याने या महिन्यात बाजार समित्यांमध्ये अत्यल्प आवक होत आहे. सध्या व्यापारी आणि खरेदीदारांमधील थेट व्यवहार वाढले आहेत. दरम्यान, दादर ज्वारीचे दर सध्या ३८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान स्थिर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com