दहिवडीचा नवीन नगराध्यक्ष कोण? आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत

दहिवडीचा नवीन नगराध्यक्ष कोण? आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत

Published on

दहिवडीचा नवीन नगराध्यक्ष कोण?

अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारपर्यंत; अंतर्गत हालचालींनी घेतला वेग

दहिवडी, ता. २६ : नगराध्यक्षा नीलम जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी अखेर निवडणूक लागली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत आज २७ फेब्रुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत असून, अंतर्गत हालचालींनी घेतला वेग घेतला आहे. त्यामुळे दहिवडीचा नवीन नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता दहिवडीकरांना लागली आहे. नगराध्यक्ष बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे.
२०२२ घ्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक सागर पोळ यांची नगराध्यक्षपदी बहुमताने निवड झाली होती. त्यानंतर १४ नगरसेवकांनी एकत्र येत नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. सागर पोळ यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर १९ मे २०२५ ला भाजपच्या नीलम अतुल जाधव यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. पक्षांतर्गत ठरल्यानुसार नीलम जाधव यांनी ११ फेब्रुवारीला नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे सुपूर्द केला होता. नीलम पोळ यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर केल्यानंतर उपनगराध्यक्षा सुरेखा पखाले यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा पदभार देण्यात आला होता.
आता उर्वरित कालावधीकरिता निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष यांची निवडणूक केली जाणार आहे. यासाठी दहिवडी नगरपंचायतीची विशेष सभा शुक्रवार ६ मार्चला १२ वाजता दहिवडी नगरपंचायतीच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या उपस्थितीत ही निवडणुक होणार आहे. नगराध्यक्षपद खुले असल्याने सर्वच नगरसेवक नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकतात. सध्या भाजपकडून वर्षाराणी सावंत यांचे नाव चर्चेत असून, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी बाळासाहेब सावंत यांना तसा शब्द दिला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादीचे सुरेंद्र मोरे हे सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत प्रभारी नगराध्यक्षा सुरेखा पखाले यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काही नगरसेवक त्यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह करत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे ही निवडणूक बिनविरोध की मतदान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

........

जयकुमार गोरेंचा शब्द
नीलम जाधव यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीवेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा शब्द अंतिम असल्याचे चित्र सर्वांनीच पाहिले होते. आताही तशीच परिस्थिती राहणार, की ग्रामविकास मंत्र्यांना आव्हान दिले जाणार हे आज सर्वांना समजेल. एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणूक लढवित असल्यास मत देण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक सदस्य हात उंचावून मत देईल. अध्यक्षाच्या निवडणुकीत जर समसमान मते पडली, तर निवडणुकीचा निकाल चिठ्ठ्या टाकून करण्यात येईल.

...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com