
लठ्ठपणा व मधुमेह टाळण्यासाठी शासन देणार दररोज टीप्स
बारामती: लठ्ठपणा आणि मधुमेह यांचे प्रमाण गेल्या दोन दशकात खूपच वेगाने वाढले आहे. याबाबत प्रबोधन करण्यासाठी दररोज शासकीय डिजिटल माध्यमांवर दररोज टीप्स दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे बारामतीच्या डॉ. राधिका शहा (वाघोलीकर) व डॉ. शशांक शहा ही जबाबदारी पार पाडणार आहेत.
कोरोनाच्या काळात लठ्ठपणा व मधुमेह या मुळे मृत्यूचे प्रमाण वाढले. दर दहा मृत्यूंमागे चार जणांना लठ्ठपणा किंवा मधुमेह होता. हिच बाब विचारात घेत आंतरराष्ट्रीय पातळीवर फिजिशियन, डाएटिशियन व इतर तज्ज्ञांनी एकत्र येत या वर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
लठ्ठपणा, मधुमेह टाळण्यासह यावर आधुनिक उपचार काय करता येतील या बाबत नुकतेच मुंबईत एक चर्चासत्र झाले. आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या चर्चासत्रामध्ये पुण्याच्या लॅप्रो ओबेसो सेंटरचे डॉ.शशांक शहा व ऑर्गनायझिंग सेक्रेटरी बारामतीच्या डॉ. राधिका शहा (वाघोलीकर) व डॉ. पूनम शहा यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या समोर दोन प्रस्ताव मांडले. लहान मुलांमधील लठ्ठपणा व कमी वयात होणारा मधुमेह टाळण्यासाठी शासनासोबत मिळून काही प्रबोधन करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.
लठ्ठपणा व मधुमेह टाळण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी प्रत्येकाला तज्ज्ञांकडे जाणे शक्य नसल्याने डिजिटल मिडीयाच्या व्यासपीठावरुन त्या बाबतच्या टीप्स देण्याची तयारी डॉ. शशांक, डॉ. पूनम शहा व डॉ. राधिका शहा यांनी दर्शविली. डॉ. राजेश टोपे यांनी तातडीने शासनाच्या सर्व डिजिटल व्यासपीठांवरुन या बाबतच्या प्रबोधनाची जबाबदारी डॉ. राधिका शहा व डॉ. शशांक शहा यांच्यावर सोपवली. विविध संस्था व व्यक्ती यांच्या मार्गदर्शनानुसार या टीप्स तयार केल्या जाणार आहेत.
पर्यावरण संतुलनासाठीही काम होणार...
सुनेत्रा पवार पर्यावरण संवर्धनासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया ही सेवाभावी संस्था गेल्या बारा वर्षांपासून चालवित आहेत. या परिषदेत सहभागी प्रत्येक डॉक्टर या पुढील काळात त्यांच्याकडे उपचार घेणा-या प्रत्येक रुग्णाला सुनेत्रा पवार यांच्यापासून वृक्षारोपणाची प्रेरणा घेत एक झाड भेट देणार असून त्या माध्यमातून आरोग्यासोबत वातावरणही चांगले राहावे या साठी प्रयत्न करणार आहेत.