दिवाळी ः मुंढे

दिवाळी ः मुंढे
Published on: 

दिवाळी ः मुंढे
---------------------

संघर्षातून घेतली दुग्ध
प्रक्रिया उद्योगात भरारी
--------------
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील संदीप नलावडे यांनी घरच्या चुलीवर दही आणि पनीर तयार करण्याच्या प्रयोगांतून दुग्ध प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केली. आज त्यांच्या ‘आदर्श डेअरी’मध्ये सुमारे ४५ दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली जाते. यासोबतच त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून ७३० हून अधिक नव उद्योजकांना दुग्ध प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण देत व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले आहे.
--------------
संतोष मुंढे
------------------
एखाद्या उद्योगाची सुरुवात मोठ्या भांडवलातूनच व्हायला हवी असे नाही. कधी ती सुरू होते, एका छोट्याशा दुकानातून. कधी घरातील चुलीवर केलेल्या प्रयोगातून, तर कधी परिस्थितीने खांद्यावर टाकलेल्या जबाबदारीतून. या छोट्या सुरुवातीला सातत्य, जिद्द आणि शिकण्याची तयारी यांची जोड मिळाली, तर त्यातून मोठा उद्योग उभा राहू शकतो हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील संदीप प्रभाकर नलावडे यांनी दाखवून दिले आहे.
बाजार सावंगी हे ऐतिहासिक महत्त्व असलेले गाव. याच गावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात संदीप यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा हरिभाऊ रावजी नलावडे यांच्याकडे पाच एकर हंगामी बागायती शेती होती. मात्र केवळ शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा चरितार्थ भागविणे अवघड होते. म्हणून आजोबांनी शेतीला जोडधंदा म्हणून गावात छोटे किराणा दुकान सुरू केले. त्यावेळी दुकानाची जबाबदारी संदीप यांच्या काकांकडे होती. संदीप शाळेत शिकत असताना काकांना काही कामानिमित्त बाहेर जावे लागले की दुकानावर बसत. दुकान मोठे नव्हते. उलाढालही मर्यादित होती. त्यामुळे काकांचेही हळूहळू या व्यवसायातील लक्ष कमी झाले. पुढे काकांनी दुकान सोडून नोकरीसाठी शहराची वाट धरली. त्या वेळी संदीप यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. त्या वेळी संदीप दहावीत होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुकान बंद करणे शक्य नव्हते. त्यामुळे आजोबांनी दुकानाची जबाबदारी संदीप यांच्याकडे सोपवली. एकीकडे दहावीचा अभ्यास आणि दुसरीकडे किराणा दुकान सांभाळण्याची जबाबदारी, अशी दुहेरी कसरत सुरू झाली. दहावी हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. पण संदीपने परिस्थितीला दोष देण्याऐवजी जबाबदारी स्वीकारली. दुकानात ग्राहक नसताना पुस्तक हातात घ्यायचे आणि ग्राहक आला, की अभ्यास बाजूला ठेवून दुकान सांभाळायचे. अशा पद्धतीने अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत ६६ टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले. त्या गुणांपेक्षा आयुष्याने शिकविलेला धडा अधिक महत्त्वाचा होता. तो म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जबाबदारी स्वीकारून पुढे जाता येते. यातून कामाची शिस्त आणि जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली.
.................................
कुटुंबाचा भार खांद्यावर ः
२००८ पर्यंत संदीप यांनी किराणा दुकानातून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. पुढे चुलते आणि वडील विभक्त झाले. वडिलांच्या वाट्याला सुमारे अडीच एकर शेती आली. दुकानाची जबाबदारी आधीपासूनच संदीप यांच्याकडे होती. त्यात कुटुंबावरील कर्जाचा भारही होता. त्यात २००९ ते २०११ हा काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण ठरला. वडील प्रभाकरराव नलावडे यांची प्रकृती बिघडली. हृदयाच्या गुंतागुंतीसाठी वैद्यकीय शस्त्रकिया करणे गरजेचे होते. प्रसंग मोठा बाका होता. कारण, त्याच वेळी लहान भाऊ रवींद्र याच्या शिक्षणासाठी सुमारे सव्वा लाख रुपयांची आवश्यकता होती.
एका बाजूला वडिलांचे उपचार आणि दुसऱ्या बाजूला भावाचे शिक्षण, अशा परिस्थितीत संदीप यांच्यासमोर आर्थिक प्रश्न उभा राहिला. या काळात शिर्डी येथील साई संस्थानअंतर्गत रुग्णालयात वडिलांवर उपचार करता येऊ शकतात, अशी माहिती संदीप यांना मिळाली. खासगी रुग्णालयाच्या तुलनेत तेथे उपचारांचा खर्च कमी होणार होता. त्यामुळे त्यांनी वडिलांना शिर्डी येथे नेऊन उपचार करून घेतले. त्यातून वाचलेली रक्कम भावाच्या शिक्षणासाठी वापरणे शक्य झाले. पण या उपचारानंतर शेतीत राबणाऱ्या वडिलांच्या श्रमाच्या कामावर मर्यादा आल्या. त्यामुळे किराणा दुकान आणि दूध संकलन सांभाळतानाच संदीप यांना शेतीकडेही लक्ष द्यावे लागले. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःचे शिक्षण मात्र संदीप यांनी थांबवले नाही. काम आणि घरची जबाबदारी सांभाळत त्यांनी पुढे एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
...............
‘नोकरी नको, उद्योग उभा करायचा’
आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि शिक्षणाची कसरत सुरू असतानाही संदीप यांच्या मनात स्वतःचा उद्योग उभारण्याचा विचार कायम होता. ‘आयुष्यभर दुसऱ्याच्या नोकरीवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय उभा करायचा’, असा त्यांचा निर्धार होता. मात्र, उद्योगासाठी भांडवल, अनुभव, बाजारपेठेचे ज्ञान आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक होते. यापैकी अनेक गोष्टींचा अभाव होता. तरीही त्यांनी प्रयत्न थांबवले नाहीत.
या सगळ्यांचा अभाव असतानाही त्यांची स्वप्ने मात्र मोठी होती. याच काळात वडिलांच्या मदतीने त्यांनी शेतीत प्रयोग सुरू केले.
.....................
ॲपल बोरने दिली साथ ः
शेतीतून उत्पन्न वाढविण्यासाठी संदीप यांच्या वडिलांनी डाळिंब आणि पेरूची लागवड करून पाहिली. मात्र डाळिंबाच्या बागेतून तीन वर्षे अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने बाग काढून टाकावी लागली. पेरूची बागही दोन वर्षांनंतर काढून टाकली. पण अपयशाने प्रयोगशीलता थांबली नाही.
तिसऱ्यांदा ॲपल बोर लागवडीचा प्रयोग करण्यात आला. त्या भागासाठी हे नावीन्यपूर्ण पीक होते. उत्पादन हाती आल्यानंतर चांगला बाजारभाव मिळाला. याच उत्पन्नाच्या आधारावर २०१६ मध्ये संदीप यांनी घराचे बांधकाम केले. दरम्यान त्याचा विवाह रूपाली यांच्याशी झाला. शिक्षण पूर्ण केलेल्या लहान भावानेही आर्थिक हातभार लावण्यास सुरुवात केली. घरची आर्थिक परिस्थिती काहीशी स्थिर होत असतानाही संदीप यांच्या मनातील उद्योग उभारण्याचा विचार मात्र कायम होता.
..................
५० लिटर दूध संकलनातून उद्योगाची बीजे ः
संदीप यांच्या दूध प्रक्रिया उद्योगाची बीजे त्यांच्या घरातच रोवली गेली होती. त्यांच्या आजोबांनी १९९८ मध्ये गावात महानंदसाठी दूध संकलन सुरू केले होते. किराणा दुकानाला जोडून असलेल्या या केंद्रावर सुरुवातीला दररोज सुमारे ५० लिटर दूध संकलित होत असे. २००९ नंतर संदीप यांनी या व्यवसायात लक्ष घातले. गावातील दूध उत्पादकांशी संपर्क वाढवला. त्यांचा विश्वास संपादन करून दूध संकलनाचे काम अधिक व्यवस्थितपणे केले. सात वर्षांच्या प्रयत्नांतून २०१६ पर्यंत दूध संकलन ८०० ते ९०० लिटरपर्यंत पोहोचले. आधी जिल्हा दूध संघाला आणि नंतर खासगी डेअरीसाठीही दूध संकलन सुरू झाले. दरम्यानच्या काळात २०१७ मध्ये संदीप यांनी मिनरल वॉटर प्लांट उभारण्याचा विचार केला. त्यासाठी बारामती आणि अहमदाबाद येथील प्लांटला भेटी देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. मात्र हा उद्योग उभारण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज होती. बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न केले, कागदपत्रांची पूर्तता केली, चर्चा केल्या. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. दोन वर्षे प्रयत्न करूनही उद्योग उभारण्याचा मार्ग सापडत नव्हता. याच टप्प्यावर संदीप यांच्या मनात एक वेगळा विचार आकार घेऊ लागला. ‘आपण दूध संकलित करतो, पण हे दूध दुसऱ्याला देण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून स्वतःच मूल्यवर्धित पदार्थ तयार केले तर?’ हाच प्रश्न पुढे त्यांच्या पुढील वाटचालीला कलाटणी देणारा ठरला. दुधापासून खवा, पनीर, पेढा, दही, लस्सी असे विविध पदार्थ तयार करता येतात, याची माहिती होती. मात्र, हे पदार्थ व्यावसायिक पद्धतीने तयार करण्याचे तांत्रिक ज्ञान नव्हते. हाच संदीपच्या पुढील वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला.
........
घरच्या चुलीवर पनीरचा प्रयोग ः
दुग्धजन्य पदार्थ निर्मितीची सुरुवात झाली ती घरी चुलीवर पनीर बनविण्यापासून. कोणताही अनुभव नव्हता. तरी घरच्यांच्या मदतीने चुलीवर दूध गरम करून पनीर तयार करण्याचे प्रयोग सुरू झाले. कधी पनीर व्यवस्थित तयार होत नसे, कधी चव बिघडे, तर कधी प्रक्रिया फसे. पण प्रत्येक वेळी काय चुकले, याचा अभ्यास करून संदीप यांनी प्रयोगात सात्यत राखले. या प्रयोगांमध्ये आई पुष्पाबाई आणि पत्नी रूपाली यांची खंबीर साथ संदीपला मिळाली. हळूहळू पनीर तयार करण्याचे कौशल्य आत्मसात झाले. पुढे २०१७-१८ मध्ये सुमारे ६५ हजार रुपयांचे खवा मशीन आणि १० हजार रुपयांचे सीलर-पॅकिंग मशीन खरेदी करून संदीपने दूध प्रक्रिया उद्योगात औपचारिक प्रवेश केला. ही गुंतवणूक छोटी होती, पण स्वप्न मोठे होते. पुढे याच व्यवसायाला ‘आदर्श डेअरी’ हे नाव मिळाले. व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रात्रीचे जागरण, कामातील उत्सुकता आणि कुटुंबाने दिलेली साथ आजही संदीपच्या स्मरणात आहे. आज डेअरीचा विस्तार झाला असला, तरी पत्नी रूपाली आणि आई पुष्पाबाई व्यवसायात कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. वडील प्रभाकरराव दूध संकलनासह गावातील आउटलेटची जबाबदारी सांभाळतात.
.....................
अभ्यासातून मिळाली व्यावसायिक दिशा ः
घरगुती प्रयोगांतून उद्योगाची सुरुवात झाली. मात्र मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे असेल तर केवळ अनुभव पुरेसा ठरणार नाही, याची जाणीव संदीप यांना झाली. त्यासाठी शास्त्रीय ज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक प्रशिक्षण आवश्यक होते. दरम्यान, कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना गुजरातमधील आनंद येथे जाण्याची संधी मिळाली. तेथे अमूल डेअरीला भेट देऊन दूध प्रक्रिया, विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, उत्पादन पद्धती, गुणवत्ता आणि व्यवस्थापन यांचा अभ्यास केला. याशिवाय कृषी विभाग तसेच छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्र येथील तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. त्यांच्या माध्यमातून विविध संशोधन केंद्रांना भेटी देऊन नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची धडपड संदीप यांनी सुरू ठेवली. दही आणि लस्सीपासून ‘आदर्श डेअरी’च्या उत्पादनांना सुरुवात झाली. दह्याचे पहिले पॅकिंग उत्पादन बाजारात आले. त्यानंतर हळूहळू उत्पादनांची संख्या वाढत गेली आणि छोट्या व्यवसायाने प्रक्रिया उद्योगाचे रूप धारण केले.
....................
व्यवसायाचा विस्तार ः
दही, लस्सी, खवा आणि पनीरपासून सुरू झालेली ‘आदर्श डेअरी’ची वाटचाल आता सुमारे ४५ दुग्धजन्य पदार्थांपर्यंत पोहोचली आहे. उद्योगाचा विस्तार होत असताना उत्पादनक्षमता वाढविणे, उत्पादनांची गुणवत्ता, पॅकिंग आणि वितरण यावर भर देण्यात आला. एकेकाळी गावातील किराणा दुकान सांभाळणाऱ्या संदीप यांच्या हातून आता विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली जात आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून २०२१-२२ मध्ये डेअरीच्या विस्तारासाठी संदीप यांनी १५ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला. या माध्यमातून उद्योगाला आवश्यक यंत्रसामग्री आणि सुविधा उपलब्ध झाल्या. त्यामुळे उत्पादनक्षमता अनेक पटींनी वाढली. उत्पादन वाढल्यानंतर बाजारपेठेचा विस्तार करण्याचे आव्हानही उभे राहिले. मात्र दूध संकलनापासून उद्योग उभारणीपर्यंत अनेक टप्पे पार केलेल्या संदीप यांनी हे आव्हानही स्वीकारले. आज ‘आदर्श डेअरी’ची उत्पादने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, जळगाव आदी जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांपर्यंत पोहोचली आहेत.
................
नव उद्योजकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ः
संदीप यांच्या दुग्ध व्यवसायाची आणि प्रक्रिया उद्योगाची माहिती समाजमाध्यमांमधून इतरांपर्यंत पोहोचत आहे. या माध्यमातून दूध प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणारे युवक संदीप यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध प्रश्न विचारू लागले. अनुभवानुसार संदीप यांनीही येणाऱ्या प्रत्येकाच्या शंकेचे निरसन करत. मात्र हळूहळू संख्या वाढत गेली आणि वेळेअभावी प्रत्येकाला स्वतंत्रपणे माहिती देणे शक्य नसल्याचे लक्षात आले. नव्याने व्यवसायात उतरणाऱ्यांना शास्त्रीय आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची असलेली गरज ओळखून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक डेअरी प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी विकसित केला. त्याला ‘आदर्श डेअरी प्रोडक्ट ॲण्ड दुग्धजन्य पदार्थ उद्योग निर्मिती प्रशिक्षण केंद्र’ असे नाव दिले. याची रीतसर नोंद केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. या प्रशिक्षणातील पहिल्या बॅचमध्ये १५ युवक सहभागी झाले. त्यानंतर दर महिन्याला एक बॅच घेण्यास सुरुवात झाली. आजवर सुमारे ३७ बॅचमध्ये महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांसह वेगवेगळ्या राज्यांतील ७३० हून अधिक इच्छुकांना दूध प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून सुमारे ३०० लहान-मोठे दुग्ध प्रक्रिया उद्योग उभे राहिल्याचे संदीप सांगतात. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येकाला वाजवी दरांत राहण्याची आणि भोजनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून प्रकल्पाच्या बाजूला नवीन बांधकाम करण्याचे त्यांचे नियोजन आहे.
आज संदीप यांनी व्यवसायात प्रगती साधत विविध प्रक्रियायुक्त उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळवीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र त्याच्या मते त्याची सर्वांत मोठी कमाई वेगळी आहे. ते म्हणतात, ‘माझ्या इथून प्रशिक्षण घेऊन एखाद्याने स्वतःचा उद्योग सुरू केला, त्यातून त्याच्या कुटुंबाला रोजगार मिळाला, तर त्यापेक्षा दुसरे मोठे समाधान नाही,’ अशी त्यांची भावना आहे.
............................................................
संदीप नलावडे, ९४०३५३७७९६
....
मुख्य फोटो ः
‘आदर्श डेअरी’द्वारे उत्पादित विविध पदार्थ. PNE26W64687
प्रक्रिया केलेले पदार्थ पॅकिंग करताना संदीप नलावडे यांच्या आई पुष्पाबाई आणि पत्नी रूपाली. PNE26W64662
तयार उत्पादनाची पाहणी करताना संदीप. PNE26W64670
----
आई-वडिलांसह संदीप नलावडे व त्यांची पत्नी.PNE26W64688
दुधावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे विविध संयंत्र. PNE26W64664
कुल्फी तयार करण्याचे यंत्र. PNE26W64672
----
प्रशिक्षणात सहभागी झालेल्या युवकांसमवेत मध्यभागी संदीप नलावडे. PNE26W64661
शालेय विद्यार्थ्यांना दुग्ध प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती देताना संदीप नलावडे. PNE26W64668
-----
हा फोटो आवश्यकतेनुसार वापरता येईल.....
आदर्श डेअरी प्लांट आणि दुग्धजन्य उत्पादनांच्या वाहतुकीसाठीचे वाहन. PNE26W64674
आदर्श डेअरीच्या आउटलेटवर दूध संकलन करताना कर्मचारी. PNE26W64666
-------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.