

दूध डेअरीकडून पावणेचार कोटींची फसवणूक
बोरगाव पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा; पुरवठादारांनाच गंडा
काशीळ, ता. १७ : बोरगाव येथील ममता मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि. या दूध डेअरीच्या संचालकांसह सात जणांनी संगनमत करून दूध व बर्फ लादी पुरवठादारांची तब्बल तीन कोटी ६८ लाख ५२ हजार ८५९ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सासपडे (ता. सातारा) येथील दूध व्यावसायिक समीर विलास विभूते यांनी बोरगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन सोपानराव साळुंखे, दीपक सोपानराव साळुंखे, संजय बाळकृष्ण साळुंखे (सर्व रा. बोरगाव), तसेच स्वाती मारुती जाधव, प्रतिभा प्रताप जाधव, मारुती रघुनाथ जाधव व प्रताप रघुनाथ जाधव (सर्व रा. इंदोली, ता. कऱ्हाड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत हा प्रकार वेळोवेळी घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. फिर्यादी विभूते यांचे पाच लाख ४२ हजार ६९१ रुपये, तसेच त्यांच्यासह अन्य १६ दूध पुरवठादार आणि बर्फ लादी पुरवठादारांनी डेअरीला केलेल्या पुरवठ्याचे एकूण तीन कोटी ६८ लाख ५२ हजार ८५९ रुपये इतके बिल परत न करता विश्वासघात व आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात जिल्ह्यातील विविध भागांतील दूध पुरवठादारांसह कर्नाटकातील बेल्लद बागेवाडी येथील गुरुदत्त मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस् आणि सातारा येथील एका बर्फ लादी पुरवठादाराचाही समावेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. थकीत रकमेची मागणी करण्यासाठी डेअरीच्या संचालकांकडे गेल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे देण्यास नकार दिला, तसेच दमदाटी केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले व उपनिरीक्षक दीपक कारळे करत आहेत.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.