-

-
Published on

सोमवारी पेस्टिंग


(छायाचित्रे : विनोद इंगोले)

संत्रा बागेला दुग्ध व्यवसायाचा
दिला भक्कम आधार

अभ्यासू युवा शेतकरी अक्षयचे काटेकोर व्यवस्थापन


अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (ता. वरूड) येथील अक्षय भड या युवकाने संत्रा- मोसंबी बागेला आधार म्हणून दुग्ध व्यवसायाची जोड दिली. त्याचा शास्त्रीय अभ्यास केला. पंजाबला जाऊन गाई घेतल्या. चारा, आहार, आरोग्य आदी सर्व बाबींचे काटेकोर व्यवस्थापन केले. आज त्यांच्या गोठ्यात प्रति दिन ३० लिटरच्या दरम्यान दूध देणाऱ्या सुदृढ गाई तयार झाल्या आहेत. घरातील सर्व सदस्य व्यवसायात कष्ट उपसतात. आज महिन्याला ५० ते ५५ टक्के नफा या व्यवसायातून कमावून ताज्या उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत कुटुंबाने तयार केला आहे.
................................................................................
विनोद इंगोले
.....................................................................
अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी हे तालुके राज्यातील प्रमुख संत्रा पट्टे म्हणून ओळखले जातात. फळबागांसाठी पाण्याची गरज अधिक असल्याने या भागात भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाला. परिणामी परिसराला ‘ड्राय झोन’ म्हणून घोषित करण्यात आले. पाणी उपशावर निर्बंध आले. पावसाचे प्रमाण कमी झाले किंवा पावसाने खंड दिल्यास संत्रा बागा वाचविण्यासाठी टँकरने पाणी देण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर येते. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला. शिवाय वाढता उत्पादन खर्च, हवामान बदल या समस्या आहेतच. या पार्श्वभूमीवर केवळ फळबागांवर अवलंबून न राहता त्यास पूरक व्यवसायांचा शाश्‍वत आधार देण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. नांदगाव (ता वरूड) येथील अक्षय भड हे त्यापैकीच एक तरुण शेतकरी. कुटुंबाची वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. पैकी सुमारे १४ एकरांत संत्रा आणि मोसंबी मिळून दीड ते दोन हजारांच्या आसपास झाडांची फळबाग आहे. अन्य क्षेत्रात खरीप व रब्बी पिके असतात. अक्षय यांनीही आपल्या फळबागांना दुग्ध व्यवसायाचा आधार देण्याचे ठरवले.

सैन्यदलात निवड, मात्र शेतीची जबाबदारी मोठी

अक्षय यांची २०१५ मध्ये सैन्यदलात निवड झाली. कुटुंबासाठी ही अभिमानाची बाब होती. मात्र एकुलते एक असल्याने एवढ्या मोठ्या शेतीची जबाबदारी कोण सांभाळणार हा प्रश्न कुटुंबासमोर होता. अखेर घरची आत्यंतिक गरज लक्षात घेऊन अक्षय यांनी पूर्णवेळ शेतीतच काम करण्याचे ठरवले. काळ्या आईची अधिकाधिक सेवा करून आपली शेती प्रगत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. सन २०१५ मध्ये राजुरा येथील जनावरांच्या बाजारातून ३६ हजार रुपयांना एचएफ जातीची गाय खरेदी केली. अभ्यासूवृत्तीच्या अक्षय यांनी त्यानंतर पंजाब गाठले. तेथील दुग्धोत्पादकांचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, व्यवसायातील अर्थकारण आदी बाबींचा सविस्तर अभ्यास केला. गाईंच्या जाती, आहार, दूध उत्पादन वाढविण्याच्या पद्धती याबाबत सोशल मीडिया तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांकडून अधिक माहिती घेतली. सन २०१६ मध्ये चार एचएफ गाई घेतल्या. प्रति गाईची किंमत ६५ ते ७० हजारांच्या घरात होती. गाय घेताना तिचे आरोग्य, वेताचा इतिहास आदी बाबी पाहिल्या. त्यानंतर पुढील काळात शेजारील एका शेतकऱ्याकडील गाय दोन लाखांना घेतली. संबंधित शेतकऱ्याला या गाईचे संगोपन आणि व्यवस्थापन करणे अशक्य झाले होते. सध्या ही गाय तिसऱ्या वेतावर आहे.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

-आज गोठ्यात नऊ गाई आहेत. पैकी चार ते पाच गाई दुधावर आहेत. एक म्हैस. गाईंची दूध देण्याची क्षमता प्रति दिन २५, ३० ते ३५ लिटरच्या दरम्यान.
-आहाराचे काटेकोर व्यवस्थापन. वयानुसार, क्षमतेनुसार प्रति गाय १५ ते २० किलो मका मुरघास, १० ते १५ किलो हिरवा चारा, ४ ते ५ किलो गव्हाचा भुसा, १५ ते २० किलो संतुलित खुराक, सोबत मिनरल मिक्चर आणि मीठ यांचा वापर.
-सुमारे दीड ते दोन एकरांत मका, नेपियर गवत यांची लागवड.
-मुबलक स्वच्छ पाणी. वेळेवर औषधे व लसीकरण. जनावरांच्या आरोग्यासाठी गोठ्याचे वातावरण नियंत्रित ठेवण्यावर भर. सिमेंट पत्र्याचे शेड. उन्हाळ्यात उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी फॉगर्स, कूलर्स व पंख्यांची व्यवस्था.
-जनावरांना दिवसातून दोन वेळ अंघोळ घालण्यावर भर.
-गोमूत्र संकलनासाठी गोठ्याच्या खालील बाजूस टाकी. सुमारे एक किलोमीटरची पाइपलाइन करून हे गोमूत्र शेतापर्यंत नेण्याची व्यवस्था केली आहे. पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून त्याचा शेतात वापर.
........................................
अर्थकारण व अन्य फायदे (इन्फो)

प्रति दिन ९० लिटरच्या दरम्यान तर कमाल १५० लिटरच्या आसपास दूध संकलन होते. सुरुवातीच्या काळात वरुड येथील खासगी डेअरीला दुधाचा पुरवठा व्हायचा. आज गावापासून सुमारे आठ किलोमीटरवरील गाडेगाव येथील खासगी डेअरीला दूध देण्यात येते. फॅट व एसएनएफनुसार ३५ ते ४० रुपये प्रति लिटर दर मिळतो. महिन्याला ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते. दुग्ध व्यवसायाचा फायदा केवळ दूध विक्रीपुरता मर्यादित ठेवलेला नाही. चार महिन्यांच्या कालावधीत १३ ते १४ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्याचा वापर फळबागांमध्ये होतो. शेणखतावर ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास आदींची प्रक्रिया देखील केली जाते. शेणखतामुळे सेंद्रिय खत बाहेरून घेण्याचा खर्च कमी केला आहे.
...................................................................
कुटुंब राबते व्यवसायात (इन्फो)

दुग्ध व्यवसायात मजुरांची उपलब्धता हे सर्वांत मोठे आव्हान असते. सकाळ-संध्याकाळ जनावरांची देखभाल, दूध काढणे, खाद्य देणे, गोठा स्वच्छ ठेवणे अशी कामे करावी लागतात. मात्र अक्षय यांच्यासोबत आई नंदा, वडील हरिदास, पत्नी मयूरी असे कुटुंबातील सर्व सदस्य राबतात. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले असून, त्यावरील खर्चात मोठी बचत झाली आहे. दुग्ध व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरी व सुदृढ जनावरे यांच्यासाठी अक्षय यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


अक्षय भड, ९९६०७६८४७४
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com