
डाळींनी शंभरी ओलांडल्याने घराचे आर्थिक बजेट कोलमडणार
पुणे - घरगुती गॅस सिलिंडरचे वाढलेले दर, भाज्यांचे कडाडलेले भाव, त्यात शरीराला पोषक असणाऱ्या डाळीही आता महागल्याने घराचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. कारण, लांबलेला पाऊस आणि केंद्र सरकारने एमएसपीत केलेल्या वाढीमुळे सर्व प्रकारच्या डाळींच्या दरात क्विंटलप्रमाणे ३००-८०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात १०० रुपये किलोच्या आत असलेल्या डाळींनी शंभरी ओलांडली आहे.
घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. भुसार बाजारात सध्या चणा आणि तूर डाळीची आवक कमी प्रमाणात होत आहे. तर, इतर डाळींची दररोज साधारण १०० ते १५० टन इतकी आवक होत आहे. सध्या खानावळी, मेस, हॉटेल, विविध समारंभ व्यवसाय सुरळीत सुरू झाले आहेत. हॉटेलात खाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या डाळींच्या दरात वाढ झाल्याची माहिती मार्केट यार्डातील डाळींचे व्यापारी जितेंद्र नहार यांनी दिली.

किरकोळ दुकानदार उदय चौधरी म्हणाले, ‘किराणा किरकोळ बाजारात डाळींचे भाव शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तूरडाळ, मूगडाळीच्या ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे. साधारणतः प्रतिकिलो पाच-सात रुपये डाळींचे भाव वाढले आहेत.’
का वाढले दर
राज्यात लांबलेला पाऊस
एमएसपीमुळे परिणाम
बाजारात डाळींची मागणी वाढली
यंदा मोठ्या प्रमाणावर निर्यात
डिझेल वाढीमुळे भाडेवाढ
मोठ्या कंपन्यांनी एमएसपीचा फायदा घेऊन कृत्रिम दरवाढ
किरकोळ (किलोप्रमाणे)
तूर डाळ १०० - १०३
चना डाळ ६८ - ७०
मूग डाळ १०४ - १०६
उडीद डाळ ११० - ११२
मसूर डाळ ९६ - ९८
लातूर, अकोल्याहून मार्केट यार्डात चनाडाळ येते, तर तूरडाळ ही अकोला, वाशीम यासह लातूर, उदगीर, बार्शी तसेच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक या भागातून मोठ्या प्रमाणात बाजारात येते.
- नितीन नहार, धान्याचे व्यापारी, मार्केट यार्ड
गॅस, भाजीपाला आणि किराणा वस्तू यांच्यात दरवाढीच्या जणू काही स्पर्धा सुरू आहेत असं वाटायला लागले आहे. एकीकडे भाववाढ होते, मात्र दुसरीकडे रोजगारात कोणतीही वाढ होत नाही. त्यामुळे घर खर्च भागविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
- ललिता खरसडे, गृहिणी, स्वारगेट
या दरवाढीचे करायचे काय?
दैनंदिन लागणाऱ्या आवश्यक वस्तूंसह आता डाळींचेही दर वाढले आहेत. त्यामुळे आर्थिक बजेट पुन्हा कोलमडणार आहे. तुम्हाला आता घर चालवताना काय कसरती कराव्या लागणार आहेत, ते आम्हाला editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कळवा.
Web Title: Dal Rate Hundred Plus Financial Budget Of The House Will Collapse
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..