दुभाजकातील झाडांची हानी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020


स्मार्ट सिटी, मेट्रोमधील समन्वयाच्या अभावामुळे झाडांचे नुकसान; पुनर्रोपणाची पर्यावरणप्रेमींकडून मागणी 

पुणे (बालेवाडी)- बाणेर- बालेवाडी येथे मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या बालेवाडी येथे मिटकॉन कॉलेजजवळ मेट्रोकडून जमिनीचा पोत तपासण्यासाठी खोदकाम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजकाच्या ठिकाणी खोदकाम केले जात आहे. हे करत असताना योग्य समन्वय न राखल्याने स्मार्ट सिटीकडून रस्त्यामध्ये दुभाजकावर सुशोभीकरणासाठी लावलेल्या झाडांचे नुकसान होत आहे. या झाडांचे त्वरित दुसरीकडे पुनर्रोपण करावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी नेहा ठाकरे यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी केली आहे. 

स्मार्ट सिटीकडून दुभाजकाच्या मध्यभागी झाडे लावून सुशोभीकरण केले आहे. पाम ट्री, बोगनवेल यांसह विविध प्रकारच्या झाडांचा यामध्ये समावेश आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी लॉकडाउन असतानाही टॅंकरने पाणी आणून ही झाडे स्मार्ट सिटीने जगवली आहेत. आता मेट्रोचे काम सुरू झाले असताना ही झाडे मुळापासून काढली जात आहेत. सुशोभीकरणासह देखभालीसाठी लागलेला खर्च हा सर्व जनतेच्या पैशातूनच केला असताना ही झाडे अशा पद्धतीने उपटून टाकणे, म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्ययच असल्याचे वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे. 

येथून मेट्रो जाणार आहे हे माहीत असतानाही झाडे लावण्यात आली. याबाबत स्मार्ट सिटी, महापालिका, मेट्रो, उद्यान विभाग यांच्यामध्ये समन्वय असता, तर अशी परिस्थिती उद्भवलीच नसती. - पांडुरंग भुजबळ, बाणेर 
 

झाडांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता दुसरीकडे पुनर्रोपण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - अरुण गोडबोले, पुणे स्मार्ट सिटी, मुख्य अभियंता 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to the trees in the divider