

खेळाच्या मैदानावर आता दांडियाचा ठेका
भव्य व्यासपीठ, ध्वनी-विद्युत यंत्रणेची उभारणी; राजकीय पाठबळाची चर्चा
सिद्धार्थ लाटकर : सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. १५ : छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात स्थानिक युवकांकडून दांडियाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. भव्य व्यासपीठासह ध्वनी आणि विद्युत यंत्रणेची उभारणी तसेच लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात ठेवण्यात आली आहे. मैदानांवर केवळ खेळाडूंचाच आवाज घुमला पाहिजे, अशी दोन वर्षांपूर्वी (प्रशासकीय काळात) पालिका प्रशासनाने भूमिका घेतली होती. तीच आजही कायम ठेवली असली तरी युवा वर्गाला लोकप्रतिनिधींकडून पाठबळ असल्याची चर्चा रंगली आहे.
पालिकेकडून शहर व परिसरात विविध प्रकारची क्रीडांगणांची निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी एक छत्रपती संभाजीराजे क्रीडा संकुल हे आहे. या संकुलात नागरिकांना चालण्यासाठी ट्रॅक, क्रिकेटच्या सरावासाठी नेट, ज्येष्ठांसाठी ओपन जिम, दोन बास्केटबॉलचे मैदान आदींचा समावेश आहे. विविध क्रीडा प्रकाराची सुविधा असल्याने संकुलात सकाळी व सायंकाळी खेळाडूंचा सराव सुरू असतो, तसेच नित्यनेमाने ज्येष्ठ नागरिक व्यायामासाठी येत असतात.
या संकुलात उद्यापासून (ता. १६) चार दिवसांसाठी स्थानिक युवकांनी दांडियाचे आयोजन केले आहे. त्यासाठीची सर्व तयारी सुरू आहे. लोकप्रतिनिधींसह स्थानिक सदस्यांचे छायाचित्र फलकांवर झळकविण्यात आले आहेत. हा उपक्रम नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आला असून, सहभागी होणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला बाऊंसर ठेवण्यात येणार आहेत. एकंदरीतच आयोजनात कोणतीही कमतरता ठेवायची नाही, असा प्रयत्न आयोजकांकडून सुरू आहे.
चौकट
खेळांची मैदाने ही सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, निवडणूक आदी कार्यक्रमांसाठी नकोत, या भूमिकेवर पालिका प्रशासन आजही ठाम राहिले आहे. कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी मैदानांवर होणाऱ्या करमणुकीच्या कार्यक्रमांकडे नगराध्यक्ष, उपाध्यक्षांनी कानाडोळा केल्यास ही प्रथा पडून जाईल, अशी धास्ती क्रीडाप्रेमींना वाटत असून, उद्या खेळाडूंनी कोणाकडे अपेक्षेने पाहायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
PNE26W58687
सातारा : छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात दांडिया महोत्सवाची सुरू असलेली जय्यत तयारी.
(प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.