दांडपट्टा आणि तलवारबाजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

सुटीत साहसी खेळ शिकण्यावर विद्यार्थ्यांचा भर
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत काहीतरी हटके करायच्या शोधात असतानाच नेहाला पारंपरिक साहसी खेळाविषयी माहिती मिळाली. लाठीकाठी, दांडपट्टा अन्‌ तलवारबाजी शिकण्याचे तिने ठरविले अन्‌ तशी सुरवातही केली. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे स्वरक्षणासाठी तरुणी उन्हाळ्याच्या सुटीत पारंपरिक साहसी खेळ शिकण्यावर भर देत आहेत.

उन्हाळी शिबिरांमध्ये पारंपरिक खेळांसोबतच क्‍लाइंबिंगसारखे खेळ शिकवले जात आहेत. लहानांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांमध्ये साहसी खेळांची क्रेझ असून, गिर्यारोहणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरुणाईकडून गडकिल्ल्यांच्या चढाईबरोबर व्हॅली क्रॉसिंग व क्‍लाइंबिंग खेळ शिकण्याला प्राधान्य दिले जात आहे. पाच वर्षांपुढील मुले-मुलेही पारंपरिक खेळ शिकण्यास प्राधान्य देत असल्याचे प्रशिक्षक सांगतात. कोल्हापूरमधील काही प्रशिक्षक पुण्यात येऊन या पारंपरिक खेळांचे प्रशिक्षण देत आहेत.

शिवगर्जना मर्दानी आखाड्याचे हेमंत तिरळे म्हणाले, ‘‘उन्हाळ्याच्या सुटीत पारंपरिक साहसी खेळ शिकण्यास प्राधान्य देणाऱ्यांमध्ये तरुणींची संख्या मोठी आहे. त्यांना लाठीकाठी, दांडपट्टा आणि तलवारबाजी शिकवले जात आहे. शारीरिक आणि मानसिक बळ निर्माण करण्यासाठी या खेळांकडे वाढत असलेला कल, हा सकारात्मक बदल आहे.’’

पारंपरिक खेळ शिकण्यासाठी एक ते सहा महिन्यांचा वेळ लागतो. स्वरक्षणासाठी मुलींनी हे खेळ शिकलेच पाहिजेत. त्यामुळे एक आत्मविश्‍वास आणि स्वतःमध्ये निर्भीडपणा येतो. असे प्रशिक्षण देणाऱ्या पुण्यात तीन ते चार संस्था आहेत. मी गेल्या तीस वर्षांपासून या क्षेत्रात काम करत असून, या खेळांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे
- हेमंत तिरळे, शिवगर्जना मर्दानी आखाडा

गडकिल्ल्यांच्या चढाईबरोबर व्हॅली क्रॉसिंग, रिव्हर राफ्टिंग अशा विविध साहसी खेळांची क्रेझ वाढली असून, उन्हाळी शिबिरांमध्ये त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. साहसी खेळांसह हिमालय आणि मनालीतील गिर्यारोहणाला प्रतिसाद मिळत आहे.
- भूषण हर्षे, गिरीप्रेमी संस्था

Web Title: Dandpatt and Fencing