
शिरूर (पुणे) : ढिली पडलेली नाकाबंदी...रात्रीच्या वेळी तर "आवो - जावो घर तुम्हारा'ची स्थिती... विशेष तपासणी नाही... "बाहेरचा' दिसला; तरी त्याला हटकणाऱ्यांचा अभाव...अन् दाट लोकवस्तीमुळे तोंड लपवायला पुरेशी जागा...कमी पडलेले पोलिसिंग, सामाजिक धारणेचा अभाव आणि प्रशासकीय पातळीवरील समन्वयाच्या अभावामुळे शिरूर शहरात बाहेरून येणारांचा ओघ वाढला आहे!
पुण्यापासून जवळ आणि नगरसह विदर्भ, मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या शिरूर शहरात गेल्या काही दिवसांत आलेल्या अनाहूत पाहुण्यांमुळे दबक्या आवाजात भीतीची चर्चा चालू झाली आहे. काही जागृत नागरिकांनी कळविल्यामुळे गेल्या चार दिवसांत नगर परिषद व आरोग्य विभागाने संयुक्त कारवाई केली. त्यामुळे तब्बल 35 जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याने ही बाब उघड झाली आहे.
असे असले; तरी शहरात बाहेरचे अनेक जण येऊन राहात असल्याची अनेक वस्त्यांतून, उपनगरांतून चर्चा आहे. पुण्यापासून साठ व नगरपासून पन्नास किलोमीटरवरील शिरूरजवळ करणे सोपे असल्याचा मेसेज हस्ते- परहस्ते जात आहेत. त्यामुळे सुरक्षितता म्हणून शहरात आसरा शोधणाऱ्यांचा ओघ वाढत आहे.
पुणे, मुंबई, नगर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथे कामधंद्यानिमित्त गेलेले अनेक जण मूळगाव म्हणून शिरूरला परतत आहेत, हे समजण्यासारखे असले; तरी क्वारंटाइन केलेल्यांमध्ये चक्क गुजरात, उत्तर प्रदेशबरोबरच; धुळे, मुंबई, नंदुरबार, यवतमाळ या भागातील लोकांचा भरणा आहे. त्यामुळे ते येथे आले कसे, कुणाकडे आले व कसे राहात होते, हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.
या क्वारंटाइन केलेल्यांना सध्या शहरातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, सध्यातरी प्रशासनाकडून त्यांची चौकशी करण्यापेक्षा विलग करण्याला प्राधान्य दिले असल्याचे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले. बाहेरून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला देण्याबाबत नगर परिषदेने मोहीम उघडली असून, नगर परिषदेचे कर्मचारी घरोघर जाऊन माहिती मिळवीत आहेत. तरीही बाहेरून आलेल्यांची माहिती लपविली जात असल्याचा संशय असून, अशा अनाहूत लोकांबाबत शेजारापाजाऱ्यांनी माहिती द्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.
बाहेरून आलेल्यांमध्ये जे मूळचे शिरूरचे आहेत, त्यांना घरात क्वारंटाइन केले असले; तरी जे छुप्या पद्धतीने आल्याचा संशय आहे व ज्यांचे येथे येण्याचे कारण न पटण्यासारखे आहे, त्यांच्याविरुद्ध कारवाई करीत असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.