ओझर येथील पुल बनला वाहतुकीसाठी धोकादायक, कारण...

रवींद्र पाटे
Sunday, 13 September 2020

नारायणगाव ओतूर रस्त्यावरील येडगाव धरणाच्या जलसाठ्यावरील ओझर येथील पुलाचे कठडे तुटल्याने हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.

नारायणगाव : नारायणगाव ओतूर रस्त्यावरील येडगाव धरणाच्या जलसाठ्यावरील ओझर येथील पुलाचे कठडे तुटल्याने हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.

ओझर येथील विघ्नहर गणपती व ओतूर, लालखण हिवरे येथे जा ये करण्यासाठी शेतकरी,पर्यटक व भाविक यांना पुलावरूनच ये जा करावी लागते. या रस्त्यावरील वाहतूकीचा विचार करून अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या कठड्याची तातडीने दुरुस्ती करावी. अशी मागणी जुन्नर बाजार समितीचे संचालक शिरीष बोऱ्हाडे यांनी केली आहे.

या बाबत बोऱ्हाडे म्हणाले येडगाव धरणाचे काम १९७२ साली करण्यात आले.त्या वेळी धरणाच्या बॅक वॉटरवर  नारायणगाव ओतूर रस्त्यावर ओझर येथे पुल बांधण्यात आला.अष्टविनायक रस्ते जोड प्रकल्पा अंतर्गत या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण दीड वर्षापूर्वी करण्यात आले.मात्र त्या वेळी पुलाचे रुंदीकरण व दुरुस्ती करण्यात आली नाही. या मुळे रुंद रस्त्यावर अरुंद नादुरुस्त पूल अशी अवस्था असल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका आहे.

ओझर येथे अष्टविनायका पैकी एक विघ्नहर गणपती देवस्थान असल्याने हा  रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचा मोबाईल बंद असल्याने या बाबत त्यांची भूमिका समजू शकली नाही.
शिरीष बोऱ्हाडे : ओझर येथे कोरोना कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.सद्यस्थितीत या रस्त्यावरून दिवस रात्र रुग्णवाहिकांची भरधाव वेगाने ये जा सुरू असते.अपघात धोका विचारात घेऊन या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous for road traffic due to broken bridge at Ozar