
Pune News : वाहतूक कोंडीमुळे गणेशखिंड रस्ता ओलांडणे धोकादायक
शिवाजीनगर- शिवाजीनगर भागातील सर्वाधिक वाहतूक असलेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक म्हणजेच गणेशखिंड रस्ता,या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, सरकारी कार्यालये, रहिवाशी असलेल्या सदनिका आहेत. विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, नोकरदार गणेशखिंड या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
या रस्त्यावर उड्डाणपूल व महामेट्रोचे काम चालू असल्याने रस्त्याचा मध्यभाग या साहित्याने व्यापला आहे. उर्वरित रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. अशा परिस्थितीत नागरिकांनी रस्ता कसा ओलांडायचा? विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.
गणेशखिंड रस्त्यावर नियमित होत असलेल्या वाहतूक कोंडीने वाहनधारक देखील हैराण झाले आहेत. सकाळी साडेनऊ ते साडेआकरा, सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.जड वाहतूकीस सकाळी ९ ते दुपारी १, सायं ५ ते रात्री ९ या वेळेत बंदी असताना देखील नियम पायदळी तुडवून वाहतूक होते.
आठ वर्षापासून या रस्त्यावरून प्रवास करणारे संतोष गाडेकर म्हणाले, "पुर्वी उड्डाणपूल होता तेव्हा वाहतूक कोंडी कमी होत असे. उड्डाणपूल पाडल्यानंतर वाहतूक कोंडीत मोठी भर पडली. मेट्रोचे बॅरिकेड्स आणि इतर साहित्य, खराब रस्ते यामुळे तर वाहतूक कोंडीत अजून भर पडली.
विकास करत असताना नागरिकांच्या नियमित आयुष्यावर परिणाम होणार नाही याची खाबरदारी देखील प्रशासनाने घेयला हवी. कार्यालयात जाताना अर्धा आणि येताना अर्धा असा एक तास वाहतूक कोंडीत जातो.
प्रतिक्रिया
पाच भागातून या ठिकाणी वाहने येत असतात. पदपथावर चालणे देखील खूपच अवघड झाले आहे. वाहतूक कोंडी प्रचंड वाढलेली आहे, वाहनांच्या लांबच- लांब रांगा असतात.मॉडर्न शाळेच्या समोर काम झालं असेल तर त्या रस्त्यावरून वाहतूक पुढे जाण्याची सोय करायला हवी. गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली की दिप बंगला चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. अंतर्गत रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी होत आहे.
- विक्रम मोहिते, अध्यक्ष मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती.
जेष्ठ नागरिक, विद्यार्थी आले तर त्यांना सुरक्षित रस्ता ओलांडताना यावा यासाठी वाहतूक पोलीस व वॉर्डन मदत करतात. जड वाहतूक कमी झाली आहे, ज्या वाहतूकदारांना माहित नाही असेच लोक रस्त्यावरून येतात आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो. बॅरिकेटिंग वाढले की वाहतूक कोंडी वाढेल मात्र वाहतूक पुढे सरकत राहील.एका ठिकाणी वाहतूक थांबणार नाही.
- बाबासाहेब कोळी, पोलिस निरीक्षक चतुःश्रृंगी वाहतूक विभाग बुलेट्स
अंतर्गत वाहतूक कोंडी होणारे रस्ते: भोसले नगर, रेंज हिल्स, बाणेर, औंध रोड, खाऊ गल्ली, ईस्केअर समोर, सेनापती बापट रस्ता.
सध्यस्थिती
ई-स्क्वेअर ते कॉसमॉस बँक दरम्यान उड्डाणपूलाचे १०२ पिलर (खांब) काम झाले असून अजून पायाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच उर्वरित कॉसमॉस बँक ते विद्यापीठ स्टेशन दरम्यान उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्यासाठी रस्ता रुंदीकरनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जी -२० कार्यक्रमामुळे गणेशखिंड रस्त्यावर काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.
तथापी सध्यस्थितीत गणेशखिंड रस्त्यावर काम सुरु करण्साठी हरे कृष्ण मंदिर पथ (सेंट्रल मॉल) चौकातील सिंग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, वाहतूक पोलीस विभागामार्फत दोन दिवस प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे.
त्यानंतर वाहतूक पोलिसांकडून कॉसमॉस बँक ते विद्यापीठ स्टेशन दरम्यान उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्यासाठी परवानगी मिळणार होणार आहे. अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा कार्यालयाकडून देण्यात आली.