Pune : विमाननगरमधील दत्तमंदिर चौकाला प्राप्त झाले गतवैभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

विमाननगरमधील दत्तमंदिर चौकाला प्राप्त झाले गतवैभव

लोहगाव : विमान नगरमधील दत्तमंदिर चौकात रस्त्यात अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणास्तव हटवण्यात आलेल्या दत्तमंदिराची या चौकातच स्थलांतरित जागेत पुन्हा नव्याने उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या चौकाला पुन्हा गतवैभव प्राप्त झाल्याच्या भावना भाविकांनी व्यक्त केल्या.

विमाननगरमधील चौकात १९९७ साली हे मंदिर उभारण्यात आले होते. तेव्हापासून हा चौक दत्तमंदिर चौक म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र २०१८ मध्ये पालिका प्रशासनाने केलेल्या विनंतीवरून हे मंदिर चौकातून हटवण्यात आले. मग दत्तमंदिराच्या जागेचा प्रश्न उभा राहिला. येथील उद्योजक रमेश आढाव यांनी मंदिराच्या श्री गुरुदत्त सेवा मंडळ विश्वस्त संस्थेची जबाबदारी हाती घेत यासाठी पाठपुरावा सुरू केला.

या चौकातच उद्योजक बी.बालाजी राव यांनी त्यांची खाजगी जागा मंदिरासाठी उपलब्ध करून दिली. या जागेवर नेवासा येथून मागावलेल्या काळ्या पाषाणात सुरेख मंदिराची उभारणी करण्यात आली. त्यामध्ये जयपूरमध्ये घडवलेल्या संगमरवरी श्री दत्तांच्या सुमारे सव्वातीन फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात गणेशपूजन, नवग्रह वास्तुशांती, भव्य मिरवणूक, प्राणप्रतिष्ठा, होमहवन, महाप्रसाद, आदी धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात आले. यासाठी गुरुदत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश आढाव, सदस्य प्रवीण देडगे, बाळासाहेब उबाळे, शाम आढाव, विनोद सोनवणी, अनिल गलांडे, बाबासाहेब साठे, एकनाथ पठारे, दर्शनसिंह ढिल्लो, रामदास जाधव, संजय म्हासळकर, संजय काळे, दत्ता देवकर, निखिलेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक योगेश मुळीक, राहुल भंडारे, तसेच ऍड. नानासाहेब नलावडे, नितीन भुजबळ, नारायण गलांडे, संजय चांदेरे, राजेंद्र खांदवे-पाटील, मोहनराव शिंदे-सरकार उपस्थित होते.

loading image
go to top