Dattatraya Bharane
Dattatraya Bharane

आरक्षणाच्या मुद्याच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रय भरणे यांचा राजीनामा

इंदापूर - मराठा, धनगर, मुस्लीम तसेच लिंगायत समाजास केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष सरकार आरक्षण देत नसल्याच्या कारणावरून इंदापूर विधानसभेचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राजीनामा देवून राज्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची कृती धाडसाची असली तरी हा निर्णय घेण्यामागे त्यांची राजकिय दुरदृष्ट्री तसेच सर्वसामान्यांचा आपला माणूस ही भावना दिसून येते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर त्यांची रणनिती यशस्वी ठरली आहे. 

इंदापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील प्रशासकिय भवन इमारतीच्या प्रवेशव्दाराशेजारी चोख बंदोबस्तात मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दुस-या दिवशी आमदार भरणे आंदोलनकर्त्यांच्या भेटीस आले. आंदोलनकर्त्यांशी आरक्षण आर्थिक किंवा जातीवर असावे अशी चर्चा सुरू असताना त्यांनी प्रथम राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देण्याची घोषणा केली. यावेळी आंदोलन कर्त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्यानंतर त्यांना एक फोन आल्यानंतर ते बाजूस गेले. ते फोनवर बोलले. त्यानंतर ते पुन्हा आंदोलनकर्त्यांना भेटले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना मराठा, धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजास शासन आरक्षण देत नसल्याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचे सांगून राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठविला. तो राजीनामा बागडे मंजूर करतील किंवा नाही. मात्र भरणे यांच्या या निर्णयाने राजकिय वर्तुळातील अनेकांना धडक मात्र बसली आहे. 

राज्य मंत्रीमंडळात २० वर्ष मंत्री पद भुषविलेल्या माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून ते निवडून येवून जायंट किलर ठरले होते. राज्यात सत्ता नसताना तसेच विरोधी आमदार असताना देखील त्यांनी बेरजेचे राजकारण करत तालुक्याच्या विकासासाठी ५०० कोटी पेक्षा जास्त निधी मिळवून दिल्याने ते लोकप्रिय बनले. साडेचार वर्षाच्या कारकिर्दीत श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर देवस्थानच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालक मंत्री गिरीश बापट यांच्याकडून २६० कोटी रूपयांचा निधी मिळवून त्यांनी विकासास चालना दिली. उजनी पाणलोट क्षेत्रातील गंगावळण गाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मिळवून दिला. रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आदी अनेक कामे मार्गी लावली. पाण्यासाठी ते खंबीर राहिले. त्यामुळे कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यातच त्यांनी अत्यंत कल्पकतेने राजीनामा देवून मराठा, धनगर, मुस्लीम तसेच लिंगायत मतदारास आपलेसे केले आहे. त्यात त्यांचा प्रचंड जनसंपर्क ही प्रचंड जमेची बाजू आहे. मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून अंतर्गत आव्हान आहे. 

10 वर्षापुर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी साठी विचारणा झाली होती. त्यावेळी त्यांनी यावेळी तिकिट दत्तात्रय भरणे यांना देण्याची विनंती करून पुढील वेळी तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींचा शब्द घेतला होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केल्याने नंतर भरणे आमदार बनले. त्यामुळे दहा वर्षापुर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्दपाळावा अशी जगदाळे पाठीराख्यांची मागणी आहे. त्याचा पक्षश्रेष्ठींना नक्कीच विचार करावा लागणार आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने यांनी सुमारे 58 कोटींहून जास्त रूपयांचा निधी खेचून आणला. माने यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर तालुक्याचा आमदार कोण ही मोहिम माने यांच्या नावासह राबविल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तिकिटासाठी रस्सीखेच आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांचा सर्वसमावेशक उमेदवार म्हणून विचार करू शकतात.

त्यापार्श्वभुमीवर भरणे यांनी चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. काँग्रेस पक्षात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे वन मॅन आर्मी समजले जातात. मात्र विधानसभा निवडणूकीस पराभव झाल्यानंतर त्यांचा जनसंपर्क कमी पडला आहे. त्यातच ज्या कारणामुळे त्यांचा पराभव झाला. त्याचे त्यांनी व्यवस्थित आत्मपरिक्षण केले नाही अशी राजकिय वर्तुळात चर्चा आहे. मराठा समाजास आरक्षण मिळवून देण्यासाठी सत्तेत असताना त्यांनी लक्षवेधी भुमिका घेतली होती. मात्र सत्ता गेल्यानंतर त्यांचा मराठा, धनगर, मुस्लीम व लिंगायत समाजास आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा कमी पडला. काँग्रेसमध्ये पराभवानंतर कार्यकर्ते टिकले मात्र एकजिनसीपणा राहिला नाही. पाटील यांच्या मवाळ व पडखाऊ धोरणामुळे  गावोगावचे काँग्रेस गट अद्याप एकत्र येवू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे आव्हान सध्यातरी बोथट आहे. केंद्र व राज्यात सत्ता येवूनसुध्दा भारतीय जनता पक्ष व शिवसेनेमध्ये एकवाक्यता नाही. तसेच जेष्ठ व कनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये मेळ नाही. त्यामुळे सत्ता ओरबाडणारे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये घुसल्याने पक्षसंघटन मजबूत झाले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूकीसाठी दोन्ही पक्षांची मदार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेत्यांवर आहे. त्यामुळे सध्यातरी दत्तात्रय भरणे यांना तोड नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकिय रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com