दौंडकरांची घरपट्टी, पाणीपट्टी स्थिर

दौंडकरांची घरपट्टी, पाणीपट्टी स्थिर

Published on

दौंड, ता. २७ : दौंड नगरपालिकेचा ३४ लाख ३४ हजार ९२१ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.
नगरपालिका सभागृहात शुक्रवारी (ता. २७) नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खास सभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपनगराध्यक्षा छाया थोरात, मुख्याधिकारी अवधूत तावडे व पालिकेचे सदस्य या वेळी उपस्थित होते. सुरदास भोसले यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. लेखापाल दत्तात्रेय गडदे या वेळी उपस्थित होते. अर्थसंकल्पात एकूण जमा १३० कोटी १८ लाख ०६ हजार ४५० रुपये दर्शविण्यात आले आहे. त्यामध्ये भांडवली जमा ९३ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये व महसूली जमा ३६ कोटी ५० लाख ५६ हजार ४५० रुपये आणि आरंभीची शिल्लक ३८ कोटी ६५ लाख ७७ हजार ४७ रुपये दर्शविण्यात आली आहे. अंदाजित खर्च १६८ कोटी ४९ लाख ४९ हजार रुपये दर्शविण्यात आले आहेत. कोणतीही करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असला तरी नगरपालिकेच्या गाळे भाडे यामध्ये दहा टक्के वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात भूसंपादन करण्यासाठी १५ कोटी रूपये, महिला व बाल कल्याण विभागासाठी १० लाख रुपये, मागास विभागासाठी १० लाख रूपये, दिव्यांग कल्याणासाठी १० लाख रूपये, शिक्षण व क्रीडा समितीसाठी १० लाख रूपये, अशा ठळक तरतूदी करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली. ज्येष्ठ सदस्य इंद्रजित जगदाळे यांच्यासह योगेश कटारिया, जीवराज पवार, विजय बोरकर, सागर जगताप, वैशाली माशाळकर, रेणुका थोरात, स्वाती सावंत, प्रणिता शिंदे, राजू बारवकर, अमोल काळे, आदींनी विविध सूचना केल्या.


भिंती बघून लाज वाटते
नगरसेवक योगेश कटारिया यांनी नगरपालिका कार्यालयातील अस्वच्छतेचे वाभाडे काढत भिंती बघून लाज वाटत असल्याची खंत व्यक्त केली. स्वच्छता आणि टापटीपपणा असावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. नगरपालिकेकडे कंत्राटी पद्धतीने कुशल व अकुशल मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर होणारा खर्च आणि त्यांना प्रत्यक्षात मिळणारा पगार याविषयी खातरजमा करण्याची मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com