esakal | Daund: 'पाहुणे' व्यस्त असताना गळित हंगामाचा शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

गळित हंगामाचा शुभारंभ
दौंड : 'पाहुणे' व्यस्त असताना गळित हंगामाचा शुभारंभ

दौंड : 'पाहुणे' व्यस्त असताना गळित हंगामाचा शुभारंभ

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ज्यांना `पाहुणे ` म्हणून संबोधले त्या प्राप्तीकर विभागाचे अधिकारी सलग चौथ्या दिवशी शोध मोहिमेत व्यस्त असताना दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्याचा तेरावा गळित हंगामाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. अजित पवार या कारखान्याचे मार्गदर्शक आहेत.

दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यात ७ ऑक्टोबर सकाळपासून प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्यांची शोध मोहिम सुरू आहे. सलग चौथ्या दिवशी अधिकार्यांकडून कार्यालयातील कागदपत्रांची व डिजिटल डाटाची पाहणी आणि पडताळणी सुरू आहे. कारखाना व परिसरात येणार्यांची चौकशी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. प्राप्तीकर विभागाचा छापा पडला किंवा शोध मोहिम सुरू झाली तरी भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. परंतु आज कारखान्याच्या गळित हंगामाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

हेही वाचा: दौंड - सुर्या लाॅजवर खुलेआम वेश्याव्यवसाय; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांचे धाकटे बंधू तथा दौंड नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक इंद्रजित जगदाळे व त्यांच्या पत्नी उमादेवी इंद्रजित जगदाळे यांच्या हस्ते बॅायलर प्रदीपन करण्यात आले. त्याचबरोबर पूजन व गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळित हंगामाचा देखील शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यास वीरधवल जगदाळे यांच्यासह पूर्णवेळ संचालक शहाजी गायकवाड, दौंड बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ जगदाळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तम आटोळे, दौंड नगरपालिकेचे आजी - माजी सदस्य व ऊस उत्पादक उपस्थित होते.

अजित पवार यांचे नातेवाईक तथा देवळाली प्रवरा (जि. नगर) येथील जगदीश कदम या कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत, परंतु काही कारणास्तव ते गळित हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. प्राप्तीकर विभाग नेमक्या कोणत्या कारणास्तव कारखान्यात शोध मोहिम राबवित आहे , याचा उलगडा चौथ्या दिवशी देखील झालेला नाही.

हेही वाचा: भोर : झोपेच्या गोळ्या चढ्या दराने विकणाऱ्या मेडिकल दुकानावर कारवाई

पाहुणे केव्हा जाणार ...?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित राज्यातील साखर कारखाने, कार्यालये आणि बहिणींच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाने ७ ऑक्टोबर पासून शोध मोहिम सुरू केली. त्यावर अजित पवार यांनी ` पाहुणे (प्राप्तीकर विभागाचे अधिकारी) त्यांचं काम करून गेल्यानंतर मी बोलणार `, अशी प्रतिक्रिया दिली होती. चार दिवसानंतरही शोध मोहिम सुरू असल्याने हे ` पाहुणे` केव्हा जाणार आणि श्री. पवार त्यांच्या शैलीत नेमके काय भाष्य करतात ?, याचे औत्सुक्य आहे.

loading image
go to top