Ajit Pawar : दोन्ही दादा मुळेच पुणे महापालिकेत नगरसेवक निवडून आले होते; उपमुख्यमंत्री अजित पवार

वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
dcm Ajit Pawar over both corporators are elected Pune Municipal Corporation ncp politics
dcm Ajit Pawar over both corporators are elected Pune Municipal Corporation ncp politicsSakal

वारजे : राष्ट्रवादीचे नगरसेवक माझ्यामुळे तर भाजपाचे नगरसेवक चंद्रकांत दादा मुळे निवडून आले आहेत. दोन दादामुळेच पुणे महापालिकेत हे नगरसेवक होते. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारजे येथे केले.

पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले महापालिकेची निवडणूक सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असल्याने थांबली आहे. सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्हालाही महापालिकेची निवडणूक हवी आहे.

तसेच देशात नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे. कोविड संकटाच्या काळात वैद्यकीय सुविधांचे महत्व लक्षात आले. त्यामुळे गेली दोन वर्षे वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला. गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन संवेदनशील असून त्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येत आहेत.

सामान्य माणसाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना पुढे आली. या रुग्णालयातील १० टक्के खाटा मोफत आणि ६ टक्के खाटा शासकीय दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तम सुविधा असलेले रुग्णालय नागरिकांसाठी उभे रहाणार आहे. बाणेर येथे देखील ५५० खाटांचे रुग्णालयही उभारण्यात येत आहेत.

शास्तीकराच्या वसुलीला स्थगिती दिली असून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूकीनंतर त्यासाठी आवश्यक शासन निर्णय काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखिमीची हमी घेतली असल्याने सर्वदृष्टीने फायदेशीर असा हा प्रकल्प आहे.

रुग्णालयाच्या खर्चावरील व्याजाचा दर केवळ सव्वा टक्के असल्याने रुग्णालयातील दरही कमी असतील. रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुण्यासह महाराष्ट्रात खाजगी भागिदारीतून अशा आरोग्य सुविधा उभारता येतील.

वारजे येथे उत्तम दर्जाचे पोलीस स्टेशन उभारण्यात येईल, त्यासाठी जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी. नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलामुळे वाहतूक कोंडी दूर होईल. पुणे, पिंपरी चिंचवड शहर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याने या भागाच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

या कार्यमक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे (दूरदृष्यप्रणालीद्वारे), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जगदीश मुळीक, धीरज घाटे, दिपक मानकर, दिलीप बराटे, दिपाली धुमाळ, सचिन दोडके, बाबा धुमाळ, सायली वांजळे उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे व आमदार भिमराव तापकीर यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक आयुक्त विक्रम कुमार यांनी केले. यावेळी जर्मनीच्या स्टीफन यांचा संदेश दाखविण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने घोरपडी येथे पुणे-सोलापूर रेल्वे लाईनवर उभारण्यात आलेला उड्डाणपूल आणि वारजे येथील समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच घोरपडी येथील पुणे-मिरज रेल्वे लाईनवर नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल आणि वारजे येथील २४ मीटर डिपी रस्त्याचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com