बाळंतपणादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने शिरूरला तणाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

शिरूर येथील खासगी दवाखान्यात महिलेचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला. या प्रकारानंतर दवाखान्यासमोर जमलेल्या नातेवाइकांनी व स्थानिकांनी संबंधित डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने तणाव पसरला. 
 

शिरूर : येथील खासगी दवाखान्यात महिलेचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला. या प्रकारानंतर दवाखान्यासमोर जमलेल्या नातेवाइकांनी व स्थानिकांनी संबंधित डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने तणाव पसरला. 

रबीया असिफ शेख (वय 19, रा. हल्दी मोहल्ला, शिरूर) असे मृत महिलेचे नाव असून, तिचे वडील युनूस हुसेन पठाण (रा. शिरूर) यांनी याबाबत शिरूर पोलिसांना कळविले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर येथील 'भिसे हॉस्पिटल'मध्ये रबीया यांना बाळंतपणासाठी दुपारी दाखल केले होते. बाळंतपण झाल्यानंतर त्यांना अचानक त्रास सुरू झाला व बेशुद्ध झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना येथील 'वेदांता हॉस्पिटल'मध्ये नेले. मात्र, तेथील डॉक्‍टरांनी त्या मृत झाल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीय संतप्त झाले. तसेच, नातेवाईक व स्थानिक नागरिकांचा मोठा जमाव जमला. हा प्रक्षुब्ध जमाव 'भिसे हॉस्पिटल'जवळ गेल्याने व संबंधित डॉक्‍टरांवर निष्काळजीपणे उपचार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने तणाव निर्माण झाला. संबंधित डॉक्‍टर दवाखाना बंद करून गेल्याने जमाव आणखी संतप्त झाला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत केले. या दवाखान्यात यापूर्वीही बाळंतपणासाठी आलेल्या महिलांच्या मृत्यूचे प्रकार घडले असून, कठोर कारवाईची मागणी नातेवाईक व उपस्थितांनी केली. 

.... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death of woman during childbirth in Shirur