Vidhan Sabha 2019 : सत्तेत आल्यास सहा महिन्यांत कर्जमाफी - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

‘‘विधानसभेची निवडणूक असल्यामुळे भाजप-शिवसेनेने हिंदुत्व, राममंदिर किंवा ३७० कलमावर बोलण्यापेक्षा शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, बेरोजगारी यांसारख्या विषयांवर बोलावे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सहाच महिन्यांत संपूर्ण कर्जमाफी करू,’’ अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

विधानसभा 2019 
बारामती शहर - ‘‘विधानसभेची निवडणूक असल्यामुळे भाजप-शिवसेनेने हिंदुत्व, राममंदिर किंवा ३७० कलमावर बोलण्यापेक्षा शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, बेरोजगारी यांसारख्या विषयांवर बोलावे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सहाच महिन्यांत संपूर्ण कर्जमाफी करू,’’ अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

बारामतीत आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्री क्षेत्र कण्हेरी येथे झालेल्या प्रचार सभेत अजित पवार यांनी ही ग्वाही दिली. ते म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारने ५४ वर्षांत अडीच लाख कोटींचे कर्ज काढले. या सरकारने पाचच वर्षात हा टप्पा पार केला. राज्यात गुंतवणूकदारांना गुंतवणूक करावीशी वाटत नाही. बेकारी वाढली आहे. अनेक चुकीचे निर्णय होत आहेत. शेतकरी देशोधडीला लागला आहे. सहकार चळवळ मोडीत काढण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडू लागला आहे. मात्र, राज्यकर्त्यांना सत्ता मिळविण्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही.’’ 

‘‘एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याची अवस्था काय झाली, हे आपण पाहतो. अनेकांचे पंख छाटण्याचे काम पद्धतशीर सुरू आहेत. अनेकांना बाजूला करण्याचे काम सुरू आहे,’’ असा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच मध्यंतरी आमदारकीच्या दिलेल्या राजीनाम्याबाबत दिलगिरी व्यक्त करून बारामतीकरांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याबद्दल खेद व्यक्त केला. तसेच विजय शिवतारे यांच्या बाबतीत जे बोललो होतो, ते करून दाखवायचे आहे आणि संजय जगताप यांना विजयी करायचे आहे, असे ते म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार...
  राज्यावर कर्जाचा डोंगर युती सरकारने उभा करून ठेवला आहे. 
  बेरोजगारी कमालीची वाढली आहे. त्याने अर्थकारणावर परिणाम झाला.
  शेतकरी व सहकार चळवळ मोडीत काढण्याचा युतीचा डाव.
  विधानसभेत राज्याच्या प्रश्‍नांवर बोला, देशाच्या नको.
  जलयुक्त शिवार योजनेचे काय झाले? शेततळी का दिली नाहीत?
  सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे.
  राज्यातील गुंतवणूक झपाट्याने कमी झाली.
  एक लाखाच्या मताधिक्‍याने विजयी होईल. 
  रोहित पवार यांच्यासह सर्व आघाडीच्या उमेदवारांना मते द्या.
  प्रचारात खालच्या पातळीवरील टीका नको.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt waiver within six months of coming to power says Ajit Pawar