राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित

प्रशांत चवरे
Monday, 28 September 2020

धनगर आरक्षणासाठी आंदोलनाचा निर्णय; भिगवण येथील राज्यव्यापी ऐक्य परिषदेत ठराव मंजूर

भिगवण (पुणे) : राज्यघटनेने धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे, परंतु राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे, अशी भूमिका सर्वपक्षीय धनगर समाजाच्या नेत्यांनी धनगर आरक्षण ऐक्य परिषदेत मांडली. तसेच, धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा ठराव या वेळी एकमताने मंजूर करण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भिगवण (ता. इंदापूर) येथील व्यंकटेश लॉन्स येथे राज्यव्यापी धनगर आरक्षण ऐक्य परिषदेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये धनगर आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. या वेळी राज्यमंत्री मंडळाची यादी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीप्रमाणे दिलेल्या २२ सवलतींच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. या ऐक्य परिषदेसाठी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार रामराव वडकुते, भाजप प्रवक्ते गणेश हाके, मदनराव देवकाते, सुरेश कांबळे, अर्जुन सलगर, चंद्रकांत देशमुख, भूषणसिंह होळकर, अक्षय शिंदे, किशोर मासाळ, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, निमंत्रक डॉ. शशिकांत तरंगे आदी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या वेळी सर्वानुमते राज्यभरातील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. सरकारने धनगर समाजातील असंतोषाची दखल घेऊन तत्काळ आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजातील नेत्यांनी दिला. या कार्यक्रमाचे नियोजन आबा बंडगर, अनिल तांबे, नाना बंडगर, महेश शेंडगे, दादा थोरात, वैभव देवकाते, प्रदीप वाकसे, अतुल देवकाते आदींनी केले. 

 

धनगर समाज हा लोकशाही मार्गाने गेली अनेक वर्षे आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करत आहे. यापुढे धनगर समाज अन्याय सहन करणार नाही. सरकारला जाग आणण्यासाठी एकच झेंडा आणि एकच दांडा, या उक्तीप्रमाणे धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी सर्वपक्षीय समाज एका छताखाली येऊन आंदोलन करणार आहे. 
- डॉ. शशिकांत तरंगे, निमंत्रक, धनगर आरक्षण ऐक्य परिषद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision of agitation for Dhangar reservation