स्मार्ट सिटी प्रकल्पाविषयी खास सभा बोलाविण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे - पुणे शहराचे ‘थ्री-डी मॅपिंग’ करण्याच्या प्रस्तावावर शिवसेनेत फूट पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला आणि ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाविषयी खास सभा बोलाविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

पुणे - पुणे शहराचे ‘थ्री-डी मॅपिंग’ करण्याच्या प्रस्तावावर शिवसेनेत फूट पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला आणि ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाविषयी खास सभा बोलाविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत औंध, बाणेर, बालेवाडी या भागात विविध प्रकल्प, योजना राबविल्या जात आहेत. या भागाशिवाय शहराच्या उर्वरित भागात कोणताही प्रकल्प ‘पॅनसिटी’अंतर्गत राबविण्यात येतो. त्यानुसार स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येणाऱ्या भागासह संपूर्ण शहराचे ‘थ्री-डी मॅपिंग’ करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर विरोधी पक्षाने स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यपद्धतीवर टीका केली. महापालिका आणि कंपनी यांच्यात झालेल्या करारानुसार वर्षातून एक सर्वसाधारण सभा घेण्यात आली नाही, सार्वजनिक- खासगी सहभाग आणि बांधा- वापरा- हस्तांतरित करा या तत्त्वानुसार प्रकल्प राबविण्याचे ठरले होते; पण त्यानुसार काम केले जात नाही, अनेक प्रकल्प आणि योजनांच्या कामाविषयी महापालिकेला अंधारात ठेवले गेले, असे आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या कामाच्या प्रगतीची माहिती नगरसेवकांना होण्यासाठी विशेष सभा आयोजित करावी, अशी मागणी विरोधी पक्षाने केली.

शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी सभेत दिलेल्या निवेदनापैकी ‘स्मार्ट सिटी’ हाच शब्द आम्हाला कळाला आहे. इतर काहीच समजले नाही, असा दावा केला. या प्रस्तावाला विरोध असल्याने मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत शिवसेनेचे सुतार आणि विशाल धनवडे यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आणि इतर उपस्थित नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. यामुळे शिवसेनेत फूट निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. जगताप यांनी स्मार्ट सिटीच्या संपूर्ण कामाची माहिती देण्यासाठी खास सभा घेण्याची गरज व्यक्त केली. ‘थ्री-डी मॅपिंग’ हे शहराच्या विकास कामांसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचा दावा केला.

Web Title: The decision to call a special meeting about the smart city project