दिवाळीनंतर शेतकरी लाभार्थ्यांना साखर वाटपाचा निर्णय जारी

मिलिंद संगई
Tuesday, 24 November 2020

अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिवाळी उलटून गेल्यावर आठवड्याने या बाबतचा अध्यादेश जारी करुन आपली कार्यक्षमताच सिध्द केली आहे. 

बारामती : दिवाळीसाठी शेतकरी लाभार्थ्यांना साखर वाटपाचा निर्णय दिवाळी उलटून गेल्यावर राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने आज एका परिपत्रकाद्वारे जारी केला गेला. वरातीमागून घोडे असाच हा प्रकार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्य मंत्रीमंडळाने 5 नोव्हेंबरच्या मंत्रीमंडळ बैठकीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या निमित्ताने राज्यातील प्राधान्य कुटुंबातील शेतकरी लाभार्थी तसेच 14 जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शेतकरी लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2020 साठी प्रति कुटुंब एक किलो या प्रमाणे साखर वाटप करण्याच्या प्रस्तावास व त्यासाठी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली होती. अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिवाळी उलटून गेल्यावर आठवड्याने या बाबतचा अध्यादेश जारी करुन आपली कार्यक्षमताच सिध्द केली आहे. 

यातही राज्यातील 14 जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंबातील शेतकरी लाभार्थ्यांसाठीच ही साखर वाटप केली जाणार असल्याने उर्वरित जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी नेमके काय करायचे याचे स्पष्टीकरण या अध्यादेशात नाही. प्रति कुटुंब एक किलो या प्रमाणे 139659 क्विंटल साखर वाटपास 52.72 कोटी रुपये खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंत्रीमंडळाने जर 5 नोव्हेंबरलाच या निर्णयाला मान्यता दिली असताना व दिवाळीत शेतकरी कुटुंबाना या निर्णयाचा लाभ होणे अपेक्षित असताना दिवाळी उलटून गेल्यावर आठवड्याने या बाबतचा अध्यादेश कसा काय निघाला हे न समजणारे आहे.

(संपादन : सागर डी. शेलार) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision to distribute sugar to farmers after Diwali