गर्दीच्या मार्गावर अतिरिक्त रेल्वे गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Decision of Railway Administration Additional trains on busy routes pune\

गर्दीच्या मार्गावर अतिरिक्त रेल्वे गाड्या

पुणे : रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत प्रवाशाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागी झाले आहे. रेल्वे स्थानकावर गर्दी आणि चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सणासुदीत गर्दीच्या मार्गावर अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्यासोबतच प्रवाशांना तिकीट तपासणीनंतर प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यात येत आहे. दरम्यान, प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे रेल्वे स्थानकावर दानापूर एक्सप्रेसमध्ये चढताना चेंगराचेंगरीत एका तरुण प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनाकडून दानापुर पटणा, नांदेड, हैदराबाद आणि नागपूर, अजनीसाठी अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे रेल्वे स्थानकासोबतच रेल्वे मंडळाच्या इतर स्थानकावरही प्रवाशांची वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून जवान नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय तिकीट तपासणी निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा बलातील जवान आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना २४ तास ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

रेल्वे स्थानकावरच प्रवाशांच्या तिकिटाची तपासणी करूनच प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यात येत आहे. तसेच, रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानांच्या मदतीने रांगेत प्रवाशांना डब्यात चढण्यासाठी मदत करण्यात येत आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून स्थानकावरील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.