मोठी बातमी: शिक्षण सेवक भरतीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; 6 हजार जागांसाठी होणार भरती

Jobs_Teaching_Staff
Jobs_Teaching_Staff

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असलेल्या शिक्षक सेवक/शिक्षक पदभरतीला आता पुन्हा वेग मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कोरोनाच्या संकटामुळे राज्यावर ओढावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे सरकारने पदभरती प्रक्रिया थांबविली होती. मात्र, नुकतीच शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळाल्याने या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांची आता दिवाळीनंतर खरी 'दिवाळी' साजरी होणार आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित सुमारे सहा हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती खुद्द राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्‌विटरद्वारे दिली आहे. राज्य सरकारने वर्ष संपत असताना शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना सरत्या वर्षात 'गिफ्ट' दिले आहे.

'कोविड-19' या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासकीय पदभरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र नुकत्याच झालेल्या बैठकीत पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेली शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया पदभरतीच्या बंदीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक सेवक पदभरतीला हिरवा कंदिल मिळाला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थासह खासगी अनुदानित, अशंत: अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील जवळपास 12 हजार 140 शिक्षण सेवक/ शिक्षक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने ही पदभरती होत आहे. मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी पाच हजार 822 उमेदवारांची यापुर्वीच निवड करण्यात आली होती. आता उर्वरित जागांवरील भरतीसाठी ही प्रक्रिया सुरू होणार आहे. 

प्रत्यक्ष पदभरतीची प्रक्रिया नव्या वर्षातच होणार सुरू 
राज्य सरकारने नुकतीच शिक्षण सेवक पदभरतीला विशेष परवानगी दिली असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठीच्या अंतर्गत बाबींची पुर्तता करण्यासाठी किमान एक ते दिड महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पदभरतीला परवानगी मिळाली असली, तरी प्रत्यक्ष भरती प्रक्रियेसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

याबाबात राज्य शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले, "सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता (एसईबीसी) आरक्षित जागा या पदभरतीत होत्या. राज्य सरकारच्या सुचनेनुसार सध्या प्रवेश प्रक्रियेत एसईबीसीच्या राखीव जागांवरील प्रवेश खुल्या प्रवर्गातून होत आहेत. मात्र, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि पदभरतीची प्रक्रिया यात खुप फरक आहे. त्यामुळे पदभरतीतील एसईबीसीच्या जागांचे काय करायचे, याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाची अंतर्गत प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात त्यावर निर्णय होऊन जानेवारीपासून शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया जाहीर होईल.''

शिक्षक भरतीची तपशीलवार माहिती :
- शिक्षक भरतीच्या एकूण जागा : 12, 140
- संस्थांनुसार भरतीच्या जागा : स्थानिक स्वराज्य संस्था (7,888), खासगी संस्था (4,252)
- रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचा कालावधी : 22 फेब्रुवारी ते 8 मार्च
- मुलाखतीशिवाय पदभरतीच्या 9,129 जागा, त्यातील 5,822 उमेदवारांची नियुक्तीसाठी जुलै 2019मध्ये निवड यादी जाहीर

पदभरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची आता साजरी होणार 'दिवाळी'

"अनेक महिन्यांपासून शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता.जवळपास एक लाख 60 हजार मुलांचे भवितव्य या भरतीवर अवलंबून आहे. अनेक शाळेत शिक्षक नसल्यामुळे शाळेची पटसंख्या सुद्धा कमी होत होती. या निर्णयामुळे अभियोग्यता धारक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.''
- संतोष मगर, संस्थापक-अध्यक्ष, डी टी एड, बी एड स्टुडंट असोसिएशन  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com