डेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट

सचिन बडे
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची तक्रार आहे. तसेच धरसोडपणामुळे १८ महिन्यांत तीन वेळा डायनिंग कारचा कंत्राटदार बदलण्याची वेळ मध्ये रेल्वेच्या प्रशासनावर आली आहे.  

पुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची तक्रार आहे. तसेच धरसोडपणामुळे १८ महिन्यांत तीन वेळा डायनिंग कारचा कंत्राटदार बदलण्याची वेळ मध्ये रेल्वेच्या प्रशासनावर आली आहे.  

डेक्कन क्विनला नुकतीच ८८ वर्षे पूर्ण झाली आहे. या गाडीतील डायनिंग कार आत्ता-आत्तापर्यंत लोकप्रिय होती. परंतु, रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरींग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) नोव्हेंबर २०१७ मध्ये डायनिंग कारचे खासगीकरण केले आणि निविदा काढून कंत्राटदाराला सहा महिन्यांसाठी उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्याच्याकडून १६ लाख ५० हजार रुपये आकारण्यात आले. परंतु, परवडत नसल्यामुळे कंत्राटदाराने सहा महिन्यानंतर सेवा पुरविण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या एका ठेकेदाराकडून ११ लाख रुपये आकारून त्याला सहा महिन्यांसाठी डायनिंगकार चालविण्यासाठी दिली. परंतु, परवडत नसल्यामुळे त्यानेही सहा महिन्यानंतर पुढे सेवा सुरू ठेवली नाही. त्यानंतर रेल्वेने आणखी एका ठेकेदाराकडून साडेनऊ लाख रुपये आकारून त्याला डायनिंग कार चालविण्यासाठी दिली आहे. ठेकेदार सातत्याने बदलत असल्यामुळे खाद्यपदार्थांचा दर्जा खालावत चालला आहे, अशी प्रवाशांची तक्रार आहे. या बाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, ‘‘डायनिंग कारमधील व्यवस्थापन पूर्वी प्रशासन करीत. आता ते आयआरसीटीसीकडे दिले आहे. कंत्राटदार नफेखोरीसाठी पदार्थांच्या दर्जाकडे दुर्लक्ष करतात.’’

काही दिवसांपासून खाद्यपदार्थांचा दर्जा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. याबाबत वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासन या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे.
- दिलीप होळकर, प्रवासी

डेक्कन क्वीनने मी नियमित प्रवास करतो. सध्या या गाडीतील डायनिंग कारचे खाद्यपदार्थ पूर्वीसारखे चविष्ट नसतात. प्रवाशांनी वारंवार केलेल्या तक्रारीकडे प्रशासनाने आतातरी लक्ष द्यावे.
- मुकेश चोप्रा, प्रवासी

काही वेळेस खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत कमतरता राहत असेल. पण, प्रवाशांना चांगले खाद्यपदार्थ मिळावेत, या साठी प्रयत्न सुरू  आहेत. त्यादृष्टीने, आयआरसीटीसीचा अधिकारी खाद्यपदार्थांचा दर्जा तपासत आहे.
- गुरुराज सोना,  क्षेत्रीय अधिकारी, आरआयसीटीसी

Web Title: Decreased food quality in the Deccan Queen