

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १५ ः ‘‘संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणणे हे केवळ आर्थिक लक्ष्य नसून रणनीतीच्या दृष्टीनेदेखील ही बाब आवश्यक ठरली होती,’’ असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना केले. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्र्यांनी आभासी पद्धतीने उपस्थितांना संबोधित केले. ‘‘क्षेपणास्त्र विकास, नौसैनिक प्लॅटफॉर्म, एअरोस्पेस इंजिनिअरिंग, रडार प्रणाली आणि अंतराळ प्रयोगांच्या बाबतीत देशाने मागील काही काळात उल्लेखनीय प्रगती केली’’ असे सिंह यांनी यावेळी नमूद केले.
देशातील वैज्ञानिक, अभियंते, उत्पादन संस्था तसेच उद्योग जगताची तांत्रिक क्षमता वाढत असल्याचे प्रतिपादन सिंह यांनी केले. ‘‘भारताच्या संरक्षण तंत्रात जसजशी आधुनिक आणि जटिल प्रणाली सामील होत आहे, तसतसे त्याची गुणवत्ता आणि विश्वसनीयता सुनिश्चित करणे तितकेच महत्त्वाचे बनले आहे. प्रत्येक महत्त्वपूर्ण सामग्री, सुटे भाग, संयोजन आणि निर्माण प्रक्रिया ही गुणवत्तेच्या कसोटीवर खरी उतरली पाहिजे,’’ असेही राजनाथसिंह म्हणाले.
‘गुणवत्ता महत्त्वाची’
कोणत्याही देशाची प्रगती ही केवळ त्या देशाने कोणती प्रणाली विकसित केली यावर अवलंबून नसते, तर ती प्रणाली किती गुणवत्तापूर्वक, विश्वसनीय आणि सुरक्षित आहे, त्यावर ठरत असते. रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या संरक्षण क्षेत्रात याचे महत्त्व आणखी जास्त आहे. कारण याठिकाणी केल्या जाणाऱ्या एका चुकीचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात, असे सिंह म्हणाले. तसेच, गुणवत्ता ही फक्त निर्माण प्रक्रियेचा औपचारिक भाग नाही तर सैनिकी अभियानाची विश्वसनीयता व राष्ट्रीय सुरक्षेचा हा मोठा आधार आहे. याच संदर्भात गैर विनाशकारी परीक्षण आणि मूल्यांकन तंत्रज्ञानाची भूमिका खूप महत्त्वपूर्ण ठरते. एखादी सामुग्री, सुटे भाग आणि संरचनेला कोणतेही नुकसान न पोहोचवता त्याची मजबुती आणि अंतर्गत स्थिती तपासली जाऊ शकते. याच्या निर्माणाच्या वेळीच संभाव्य त्रुटी शोधणे व उपकरणांची गुणवत्ता सुनिश्चित करणे शक्य असते, असेही सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.