esakal | रोजगारक्षम होण्यासाठी ‘डिग्री प्लस’ची मात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai Phule Pune University

रोजगारक्षम होण्यासाठी ‘डिग्री प्लस’ची मात्रा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पारंपरिक अभ्यासक्रम शिकत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्य वाढावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘डिग्री प्लस’ नावाचा अभिनव उपक्रम घेऊन येत आहे. सर्व विद्याशाखांना सामावून घेणारे आणि उद्योगांना अपेक्षित ४०० पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचा हा खजिना नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

काय आहे उपक्रम?

पदवीचे शिक्षण घेत असतानाच उद्योग, सेवा, माहिती-तंत्रज्ञान आदी क्षेत्रांना अपेक्षित कौशल्यं विद्यार्थ्यांना यावीत म्हणून उद्योगांच्याच सहभागाने सुरू केलेला उपक्रम. ऑनलाइन, ऑफलाइन किंवा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित हे अभ्यासक्रम विद्यार्थ्याला मर्जीप्रमाणे निवडता येतील.

प्रवेश केव्हा?

संपूर्ण वर्षभर पदवीला शिकत असताना विद्यार्थ्याला हे अभ्यासक्रम शिकता येतील. यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असून, नोव्हेंबर महिन्यात प्रवेश सुरू होतील.

कसे शिकणार?

एका संकेतस्थळाच्या माध्यमातून अभ्यासक्रम विद्यार्थ्याला शिकता येईल. ज्यामध्ये व्हिडिओ, ऑनलाइन कार्यशाळा, उपक्रम यांच्या माध्यमातून शिकविले जाईल. आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिकवणी, कार्यशाळा किंवा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष अनुभव यांची रचना करण्यात आली आहे.

कोणाला फायदा?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने खासगी कंपनीच्या सहकार्याने ४०० पेक्षा जास्त अभ्यासक्रम तयार केले आहेत. उपक्रमाची व्याप्ती महाराष्ट्रभर असेल; परंतु, प्रथम प्राधान्य विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना असेल.

कोठे?

विद्यापीठाने उपलब्ध केलेल्या संकेतस्थळावर लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमच्या आधारे ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासक्रम घेता येईल.

विद्यापीठात येणारे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम असतीलच असे नाही. मात्र, हुशार नक्कीच असतात. जगाच्या गरजा आणि ज्ञान वेगाने बदलत आहे. नियमित अभ्यासक्रमात ही कौशल्ये प्राप्त होत नाहीत. अशा वेळी बदलत्या जगाच्या कसोटीवर उतरण्यासाठी अतिशय माफक किमतीत हे अभ्यासक्रम डिग्री प्लसच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

वैशिष्ट्ये

विद्यापीठासह आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रमाणपत्र मिळणार

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील सर्व अभ्यासक्रमांचा समावेश

उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ प्रत्यक्ष शिकवणार

प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव

खिशाला परवडेल अशा दरात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम

प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम

अभ्यासक्रमांबाबत...

ॲमेझॉन, कोर्सेरा, सिंपली लर्निंग, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

सहभागी उद्योग

४०० पेक्षा अधिक संख्या

३ ते ११ महिने कालावधी

४०० ते ४००० रुपये शुल्क

प्रवेश क्षमता बंधन नाही

loading image
go to top