

पुणे, ता. २७ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाआधीच आता विद्यार्थ्यांना आपल्या पदवी प्रमाणपत्राची ऑनलाइन पडताळणी करता येणार आहे. प्रमाणपत्रावर नाव किंवा इतर तपशिलात काही चूक असल्यास, ती वेळीच दुरुस्त करण्याची सोय विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता घरपोच ‘बिनचूक’ पदवी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, दुरुस्तीसाठी विद्यापीठात मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२७ व्या पदवीप्रदान सोहळ्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. साधारणतः पदवीप्रदान कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र टपालाने घरपोच दिले जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. मात्र, अनेकदा प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांच्या नावात किंवा इतर माहितीत तांत्रिक चुका राहतात. एकदा प्रमाणपत्र छापून हाती आल्यानंतर या चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने हा निर्णय घेत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र छापण्यापूर्वीच ते ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
६५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता
यंदाही पदवीप्रदान सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ६५ लाख रुपयांच्या खर्चास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकतीच मान्यता दिली आहे.
उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंग प्रक्रियेसही हिरवा कंदील
यासोबतच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ ते मार्च-एप्रिल २०२९ या कालावधीत होणाऱ्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, तसेच पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या मास्किंग सेवेच्या प्रत्यक्ष खर्चासही व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे.
विद्यापीठाच्या नव्या निर्णयानुसार विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेतस्थळाद्वारे आपले पदवी प्रमाणपत्र ऑनलाइन पाहू शकतील. त्यात कोणतीही चूक असल्यास ते स्वतः योग्य तो बदल करून घेऊ शकतील. विद्यार्थ्यांकडून दुरुस्ती झाल्यानंतर अंतिम झालेले आणि पूर्णपणे बिनचूक प्रमाणपत्रच छापून त्यांना पाठवले जाईल.
- डॉ. राजेंद्र तलवारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.