तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू ग्रामपंचायतीची जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

भाविकांच्या सेवेसाठी

  • गोपाळपुरात पन्नास युनिटचे फिरते शौचालय
  • विकास आराखड्यांतर्गत दोन वेगवेगळ्या ठिकाणी १६० युनिट
  • फूटपाथवरील टपऱ्या हटविण्यात येणार
  • स्वच्छ पाणीपुरवठ्याचे नियोजन
  • अग्निशामक दलाचे दोन बंब उपलब्ध 

देहू - ‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना विविध सोयी-सुविधा देण्यासाठी देहू ग्रामपंचायत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आरोग्य, स्वच्छता, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी २६ कर्मचारी नियुक्त केले आहेत,’’ अशी माहिती देहूचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर यांनी दिली. त्याचप्रमाणे उन्हाळा असल्याने सरकारकडे पिण्याच्या पाण्याचे दहा टॅंकरची मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याबाबत अर्जुन गुडसुरकर म्हणाले, ‘‘बीज सोहळ्याला सुमारे दोन लाख भाविक येथे येतात. त्यामुळे भाविकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सज्ज आहे. स्वच्छ आणि सुंदर देहूचा अनुभव यावा म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. गावात स्वच्छतेसाठी २६ कर्मचारी नेमलेले आहेत. इंद्रायणीच्या घाटावर कोणीही शौचास बसू नये म्हणून खास पथके तैनात करण्यात आलेली आहेत. नव्याने बांधलेल्या अत्याधुनिक शौचालयाचा वापर करण्यासाठी भाविकांना सांगण्यात येत आहे. जागोजागी कचरा गोळा करण्यासाठी दहा ट्रॉली आणि तीन घंटागाडी उभी करण्यात येणार आहे. मुख्य देऊळवाडा परिसर, वैकुंठगमन स्थान परिसर, माळवाडी, विठ्ठलवाडी, गाथा मंदिर परिसरात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. गावातील गटारे स्वच्छ करण्यात येत आहेत. हॉटेल व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. अंतर्गत रस्त्यावर स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक नळकोंडाळे बसविण्यात येणार आहेत. विविध खात्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. गावात पथदिवे बसविण्यात येत आहेत. तसेच नदी घाटावर दिवे बसविण्यात येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dehu Gram Panchayat prepares for Tukaram Seed Ceremony