

अभिरुची पानासाठी...
मन मनास उमगत नाही...
आपण नेहमीच आनंद पुढे का ढकलतो?
- नितीन फलटणकर
परवा एका मित्राचा फोन आला, काय करतोयस?
मी म्हणालो, कामात आहे.
ऐक एक नवीन शॉप सुरु करतोय. येतोस का? संध्याकाळी चहाही सोबत घेऊ. खूप दिवस झाले निवांत बसलो नाही.
मी सहज म्हणालो, आज नको रे. थोडं काम आहे. हे संपलं की निवांत बसू.
फोन ठेवला. काम संपलं. पण चहा राहून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचाच फोन आला. या रविवारी कुठेतरी जाऊया का?.
मी हसलो. यार, सध्या जरा धावपळ आहे. पुढच्या रविवारी बघू. असं म्हणता म्हणता कितीतरी रविवार पुढे गेले.
काम कधीच संपत नाही.
पैसे कधीच पुरत नाहीत.
वेळ कधीच मिळत नाही.
मन म्हणतं, अजून थोडी मेहनत करू. आणि याच गडबडीत आपण आनंदाला नेहमीच तारीख देतो. ‘नंतरची.’
हे काम झालं की फिरायला जाईन.
पैसे आले की छान हॉटेलमध्ये जेवायला जाता येईल.
मुलांची जबाबदारी थोडी कमी झाली की स्वतःसाठी वेळ देईन.
नोकरीत थोडं स्थिर झालो की पुस्तक वाचेन.
सगळं नीट झालं की निवांत जगू.
पण गंमत अशी की आयुष्यातलं ''सगळं नीट'' कधीच होत नाही.
एक प्रश्न संपतो, तोपर्यंत दुसरा उभा राहतो. एक जबाबदारी पूर्ण होते, दुसरी दारात उभी असते आणि आपण आनंदाला सतत सांगत राहतो, थांब... आत्ता नाही.
खरं तर आपण आनंद नाकारत नसतो. आपण तो पुढे ढकलत असतो. पण आयुष्यात ''नंतर'' नावाचा एखादा सुरक्षित दिवस असतो का? नसतो. अगदी कोणाच्याच आयुष्यात तो नसतो.
आपल्याला वाटतं, उद्या वेळ असेल. उद्या पैसे असतील. उद्या मन मोकळं असेल. पण उद्या आला की त्याच्यासोबत नवी चिंता आलेली असते.
मग जगायचं कधी? आनंद म्हणजे मोठी सहलच हवी, किंवा लाखो रुपए खर्च कारावेत असं नाही.
घराच्या गॅलरीत बसून घेतलेल्या गरम चहाच्या एका घोटातूनही आनंद मिळू शकतो. वारंवार भेटायला बोलावणाऱ्या मित्राला सरप्राईज भेट देऊन त्याच्यासोबत मारलेल्या गप्पांमध्येही आनंद आहे.
आई-बाबांच्या जवळ पाच मिनिटं बसणंही आनंदाचे एक कारण असू शकतं. एखाद्या आवडत्या गाण्यातूनही आनंद मिळू शकतो. किंवा काहीही न करता शांतपणे खिडकीतून बाहेर पाहतानाही कुणाला आनंद उमगू शकतो.
आपण आनंदाला नेहमी एखाद्या मोठ्या प्रसंगाशी जोडून ठेवतो. म्हणून तो आपल्यापासून लांब जातो. कधी कधी आयुष्य बदलण्याची गरज नसते. फक्त रोजच्या जीवनात मिळणारे छोटे-छोटे आनंद ओळखण्याची गरज असते.
परवा तो मित्र पुन्हा भेटला. मी त्याला म्हटलं, चल, आज चहा घेऊया.
तो हसला. आज कशाचा बहाणा?
मीही हसलो. काही नाही. आज ''नंतर'' नको.
कदाचित आयुष्य असंच असतं. आपण मोठ्या आनंदाची वाट पाहत राहतो आणि वाट पाहता पाहता छोटे छोटे आनंद आपल्या बाजूने निघून जातात.
म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी आनंदासाठी नक्की कशाची वाट पाहतोय?
पैशांची?
वेळेची?
परिस्थिती बदलण्याची?
की फक्त स्वतःला परवानगी देण्याची?
कारण शेवटी...
आनंदासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते.
आयुष्याच्या अपूर्णतेतही एखादा क्षण मनापासून जगता येतो.
आणि कदाचित म्हणूनच...
आजचा चहा आजच प्यावा. आजचा फोन आजच करावा. आज भेटता येत असेल तर आजच भेटावं.
कारण ''नंतर'' हा शब्द खूप छोटा आहे...
पण कधी कधी त्याच्यामागे संपूर्ण आयुष्य निघून जातं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.