देश संक्षिप्त

देश संक्षिप्त
Published on

दिल्ली व परिसर

फसवणूक प्रकरणी
ईडीचे छापे
नवी दिल्ली : घरखरेदीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली-एनसीआरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. एव्हीजे डेव्हलपर्स (इंडिया) आणि रुद्रा बिल्डवेल कन्स्ट्रक्शन यांच्या योजनेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे मनी लॉन्डरिंगचा तपास सुरू आहे. ‘ताबा मिळेपर्यंत ईएमआय नाही’ या योजनेअंतर्गत घरखरेदीदारांकडून गृहकर्ज घेऊन सदनिका बुकिंग करून घेतले, मात्र अनेक वर्षांनंतरही ताबा दिला नसल्याचा आरोप आहे.
-----
जे. पी. नड्डा
‘एम्स’मध्ये दाखल
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुरुवारी कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात आली. ‘एम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना हृदयरोग विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
---
पर्यावरण कायद्यांची
अंमलबजावणी हवी
नवी दिल्ली : देशात पर्यावरणविषयक प्रगत कायदे अस्तित्वात असले तरी त्यांना अनेकदा बगल दिली जाते, त्यामुळे त्यांची नीट अंमलबजावणी होत आहे की नाही याची खात्री न्यायव्यवस्थेने करावी, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शुक्रवारी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्जल भुयान यांच्या भाषणातील मुद्द्यांचा उल्लेख करत त्यांनी पायाभूत प्रकल्पांच्या पर्यावरणीय परिणामांबाबत न्यायालयांच्या भूमिकेत सातत्य असणे आवश्यक असल्याचे सांगितले.
---
मुलांमधील
व्हेपिंगवर चिंता
नवी दिल्ली : राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी संसदेत मुलांमध्ये वाढत असलेल्या व्हेपिंगच्या समस्येवर आवाज उठवल्यानंतर ‘मदर्स अगेन्स्ट व्हेपिंग’ (एमएव्ही) संघटनेने त्याचे स्वागत केले. व्हेप आणि ई-सिगारेट सुरक्षित असल्याचा गैरसमज पसरवून सोशल मीडियाद्वारे मुलांपर्यंत ही उत्पादने पोहोचत असल्याबद्दल मालिवाल यांनी चिंता व्यक्त केली होती. एमएव्ही हा नव्या युगात मुले व तरुणांचे व्हेप्स, ई-सिगारेटपासून संरक्षण करण्यासाठी कार्यरत असणारा समूह आहे.
---
उत्तर भारत

मायावतींकडून
निषेध व्यक्त
लखनौ : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उत्तराखंडमधील सभेनंतर मंचाचे कथित ‘शुद्धीकरण’ केल्याच्या घटनेचा बसप प्रमुख मायावती यांनी शुक्रवारी तीव्र निषेध केला. या प्रकरणातील जातीयवादी व सरंजामी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच नांदेड येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
--
पंडितांच्या सुरक्षेकडे
दुर्लक्ष नको
श्रीनगर : काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांना मिळालेल्या दहशतवादी धमक्यांना सहजपणे घेऊ नये, असे जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी सांगितले. गेल्या काही वर्षांत अल्पसंख्याक समुदायावरील लक्ष्यित हल्ल्यांची आठवण करून देत त्यांनी सुरक्षा यंत्रणांनी या धमक्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली. धमक्यांमागील व्यक्तींवर कठोर कारवाई करून खोऱ्यात कार्यरत काश्मिरी पंडितांसाठी पूर्ण सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
----
पूर्व भारत

आरजी कर प्रकरणी
आणखी अटक
कोलकता : येथील आरजी कर रुग्णालयातील महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्या प्रकरणात घाईत अंत्यसंस्कार करण्याच्या कटप्रकरणी आणखी एक आरोपी संजीव मुखर्जी याला पोलिसांनी अटक केली आहे. चायनार पार्क परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी माजी तृणमूल काँग्रेस आमदार निर्मल घोष यांनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आणखी एक आरोपी, पानिहाटी नगरपालिकेचा नगरसेवक सोमनाथ डे अद्याप फरार आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com