दिल्लीत मतदारयादीतून ४७.५६ लाख नावे वगळली

दिल्लीत मतदारयादीतून 
४७.५६ लाख नावे वगळली
Published on

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता. ३१ : दिल्लीतील मतदारयादीच्या विशेष सखोल फेरपडताळणीनंतर (एसआयआर) आज प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत ९७ लाख ५३ हजार ५७७ मतदारांचा समावेश करण्यात आला असून, एक कोटी ४५ लाख १० हजार २९९ नोंदणीकृत मतदारांपैकी तब्बल ४७ लाख ५६ हजार ७२२ मतदारांची नावे प्रारूप यादीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जवळपास एक तृतीयांश मतदार प्रारूप यादीतून बाहेर राहिले आहेत.
दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे दीड महिना चाललेल्या मतदार पडताळणी मोहिमेत ६७.२ टक्के मतदारांनी गणना अर्ज सादर केले. या अर्जांचे डिजिटायझेशनही करण्यात आले. मात्र, उर्वरित ३२.८ टक्के मतदारांच्या बाबतीत आवश्यक माहिती उपलब्ध न झाल्याने त्यांना अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दुबार आणि इतर (एएसडीडीओ) या श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, घरोघरी पडताळणी करताना अनेक मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर आढळले नाहीत. काही मतदार दिल्लीतीलच अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, तर काही जण शहराबाहेर गेल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या नोंदींची पुन्हा पडताळणी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.
प्रारूप मतदारयादीत नाव नसलेल्या मतदारांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ‘फॉर्म-६’ सादर करावा लागणार आहे. प्राप्त दाव्यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून छाननी करण्यात येणार असून, बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक पडताळणी करणार आहेत. मतदार पात्र असल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर त्यांचे नाव अंतिम मतदारयादीत समाविष्ट केले जाणार आहे. चार नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com