

फूडपॉइंट
चविष्ट उपवास
- मीनाक्षी काटकर
--------------------------------------------
भोपळ्याच्या पुऱ्या
वाढप - ३ व्यक्तींसाठी.
साहित्य : एक वाटी वरईचे पीठ, १ वाटी शिंगाडा पीठ, १ वाटी राजगिरा पीठ, १ वाटी किसलेला गूळ, १ वाटी उकडलेल्या भोपळ्याचा गर, पाव चमचा वेलची पूड, गरजेनुसार तूप.
कृती : प्रथम शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ व वरईचे पीठ एकत्र करावे. त्यात गूळ, भोपळ्याचा गर आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करावे व या मिश्रणाचा घट्ट गोळा तयार करावा. आता या गोळ्याच्या छोट्या लाट्या करून पुऱ्या लाटून घ्याव्यात. कढईत तूप तापवून त्यात या पुऱ्या तळाव्यात. झाल्या भोपळ्याच्या पुऱ्या तयार.
००००००
केळ्याचा हलवा
वाढप - २ ते ३ व्यक्तींसाठी.
साहित्य : एक वाटी वरईचे पीठ, १ वाटी शिंगाडा पीठ, १ वाटी राजगिरा पीठ, २०० ग्रॅम गूळ, गरजेनुसार तूप, १ छोटा चमचा वेलची पूड, १ वाटी ड्राय फ्रुट भरड, ४ वाट्या पाणी, १ वाटी केळ्याचा गर.
कृती : सर्वात पहिले पाण्यात गूळ घालून उकळून घ्यावा. कढईत तूप घालून त्यात वरईचे, शिंगाड्याचे व राजगिऱ्याचे पीठ एकत्र करून चांगले भाजून घ्यावे. मग यात गुळाचे पाणी, केळ्याचा गर, वेलची पूड व ड्राय फ्रुट भरड घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. या मिश्रणाला मंद आचेवर एक वाफ आणावी.
००००००
उपवासाची बर्फी
वाढप - २ ते ३ व्यक्तींसाठी.
साहित्य : एक वाटी वरईचे पीठ, १ वाटी शिंगाड्याचे पीठ, १ वाटी राजगिरा पीठ, २०० ग्रॅम साखर, गरजेनुसार तूप, १ छोटा चमचा वेलची पूड, १ वाटी ड्राय फ्रुट भरड, १ वाटी खोबऱ्याचा कीस, गरजेनुसार पाणी, १ वाटी केळ्याचा गर.
कृती : सर्वप्रथम साखरेचा पाक करून घ्यावा. कढईत तूप घालून वरईचे, शिंगाड्याचे व राजगिऱ्याचे पीठ एकत्र करून चांगले भाजून घ्यावे. मग त्यात केळ्याचा गर व वेलची पूड घालावी. त्यानंतर खोबऱ्याचा कीस, ड्राय फ्रुट भरड व साखरेचा तयार पाक घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. ताटाला तूप लावून त्यात तयार मिश्रण पसरवावे व चाकूने वड्या पाडाव्यात.
टीप - या मिश्रणाचे लाडूही वळू शकता.
००००००
वरई फिरणी
वाढप - ५ ते ६ व्यक्तींसाठी.
साहित्य : ५० ग्रॅम वरई, १ लिटर दूध, १०० ग्रॅम साखर, १ चमचा वेलची पूड, सजावटीसाठी बदाम व पिस्त्याचे काप.
कृती : वरई थोडा वेळ पाण्यात भिजवावी व नंतर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावी. कढईत दूध उकळून घ्यावे. उकळलेल्या दुधात वरई घालून घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवावी. त्यानंतर त्यात साखर व वेलची पूड घालून मिश्रण ढवळावे. बदाम पिस्त्याचे काप घालून फिरणी सर्व्ह करावी.
००००००
वरई तिखी
वाढप - ३ ते ४ व्यक्तींसाठी.
साहित्य : एक वाटी वरईचे पीठ, १ वाटी राजगिरा पीठ, १ वाटी शिंगाडा पीठ, १ वाटी किसलेला बटाटा, १ वाटी शेंगदाण्याचे कूट, १ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, चिमूटभर सोडा, ५ ते ७ कढीपत्त्याची पाने, १ चमचा तूप.
कृती : प्रथम वरईचे, राजगिऱ्याचे व शिंगाड्याचे पीठ एकत्र करावे. त्यात किसलेला बटाटा, शेंगदाण्याचे कूट व हिरव्या मिरचीची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करावे. मग मीठ व कढीपत्त्याची पाने घालावीत व पाणी घालून मिश्रण पातळसर भिजवून घ्यावे. या मिश्रणात सोडा घालावा. तव्याला तूप लावून हे मिश्रण आयत्यासारखे जाडसर लावावे. वरईची तिखी दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्यावी.
००००००
वरई फळ
साहित्य : दोनशे ग्रॅम वरईचे पीठ, ५० ग्रॅम शेंगदाण्याचे कूट, १ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, २ चमचे लाल तिखट, गरजेनुसार तेल, ५ ते ७ कढीपत्त्याची पाने, १ गुळाचा खडा, चवीनुसार मीठ व चिंच.
कृती : वरईच्या पिठात मीठ व हिरव्या मिरचीची पेस्ट घालावी. मग या मिश्रणात गरम पाणी घालून गोळा मळून घ्यावा. या मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून त्याच्या खोलगट वाट्या तयार कराव्यात. एका पातेल्यात तेल तापवून त्यात कढीपत्त्याची पाने घालावीत. मग शेंगदाण्याचे कूट, चिंच, लाल तिखट, गूळ व पाणी घालून पातळ आमटी तयार करावी. आमटीला उकळी आल्यानंतर त्यात वरईच्या पिठाच्या वाट्या घालाव्यात. हे मिश्रण दहा मिनिटे शिजू द्यावे. वरई फळ तयार.
००००००
उपवासाच्या शेवया
वाढप - २ व्यक्तींसाठी.
साहित्य : दोनशे ग्रॅम शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया, ५ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ८ ते १० कढीपत्त्याची पाने, चवीनुसार मीठ, १ चमचा लाल तिखट, गरजेनुसार तूप व पाणी, अर्धी वाटी दाण्याचे कूट, एका बटाट्याचा कीस.
कृती : सर्वप्रथम कढईत तूप तापवून त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. मग कढीपत्ता व बटाट्याचा कीस घालून मिश्रण परतून घ्यावे. त्यात लाल तिखट, शेंगदाण्याचे कूट व मीठ घालून मिश्रण एकजीव करावे. नंतर त्यात शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया घालाव्यात व मिश्रण परतून घ्यावे. या मिश्रणात गरम पाणी घालून मिश्रण मंद आचेवर शिजवावे. गरमागरम शेवया दह्याबरोबर सर्व्ह कराव्यात.
००००००
वरईचे अनारसे
वाढप - १० ते १५ व्यक्तींसाठी.
साहित्य : एक किलो वरई, ८०० ग्रॅम गूळ, तळण्यासाठी तेल, गरजेनुसार खसखस.
कृती : वरई तीन दिवस पाण्यात भिजत घालावी. तीन दिवसांनंतर वरई पाण्यातून काढून कापडावर पसरवावी. वरई थोडी कोरडी झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून तिचे बारीक पीठ करावे. या पिठात गूळ किसून घालावा व परत मिक्सरमध्ये फिरवून गोळा तयार करावा. हे मिश्रण दोन ते तीन दिवस मुरण्यासाठी ठेवावे. दोन ते तीन दिवसांनंतर या पिठाचे छोटे गोळे करून अनारसे लाटावेत. लाटलेले अनारसे खसखसमध्ये घोळवून तुपामध्ये मंद आचेवर तळून घ्यावेत.
टीप : या अनारशांमध्ये शिंगाडा पीठही वापरू शकता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.