'इंदापुरातील राहती घरे वाहून गेलेल्या कुटुंबांना मदत करावी'

डाॅ. संदेश शहा
Friday, 30 October 2020

इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मदनवाडी येथील सुतार कुटुंबांची राहती घरे पाण्याबरोबर वाहून गेल्याने दोन्ही कुटुंब सध्या उघड्यावर पडली आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना तातडीने मदत करावी.

इंदापूर : इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मदनवाडी येथील सुतार कुटुंबांची राहती घरे पाण्याबरोबर वाहून गेल्याने दोन्ही कुटुंब सध्या उघड्यावर पडली आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी आखिल महाराष्ट्र सुतार समाज महासंघाच्या वतीने तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. 

महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत पांचाळ, पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप आनंदे यांच्या सुचनेनुसार महासंघाचे इंदापूर तालुकाध्यक्ष विजय सुतार, सोशल मीडिया पुणे जिल्हा प्रमुख संदिप सुतार, कार्याध्यक्ष सुहास सुतार, उपाध्यक्ष दत्तात्रय सुतार, सचिव गणेश सुतार, विलास सुतार, नवनाथ सुतार, अमित सुतार यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

तालुकाध्यक्ष विजय सुतार म्हणाले, ''दतात्रय अर्जुन सुतार व मोहन अर्जुन सुतार (रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा मूळ व्ययसाय हा सुतारकाम व मोलमजुरी आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे.

त्यातच बुधवार (ता. १४ ऑक्टोबर) रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निंबोडी येथील तलावाचा मदनवाडी हद्दीतील सांडवा फुटल्याने दोन्ही कुटुंबांची राहते घरे वाहून गेली आहेत. तसेच त्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ते सध्या बेघर असून, जिल्हा परिषद शाळेत राहत आहेत. दोन्ही बेघर कुटुंबाना शासनाच्या वतीने राहण्यासाठी घरकुल योजनेअंतर्गत तातडीने घरे मिळावीत अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन मलगुंडे, सुंदर कुसाळकर, कपिल लांडगे उपस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for help to families whose houses were washed away by the floods