"मॉडेल तुळशीबाग' प्रकल्प राबवा व्यापारी संघटना, पथारी व्यावसायिक असोसिएशनची मागणी

"मॉडेल तुळशीबाग' प्रकल्प राबवा व्यापारी संघटना, पथारी व्यावसायिक असोसिएशनची मागणी

पुणे- शहराचे भूषण समजल्या जाणाऱ्या तुळशीबागेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, वास्तुविशारद किरण कलमदाणी यांनी तयार केलेला "मॉडेल तुळशीबाग' हा प्रकल्प महापालिकेकडे पडून आहे. तो राबवल्यास तुळशीबागेचे रूप बदलेल, त्यासाठी महापालिकेकडे मागणी करणार असल्याची माहिती तुळशीबाग परिसरातील व्यापाऱ्यांनी दिली.

"सकाळ'ने आयोजित केलेल्या बैठकीस "तुळशीबाग परिसर व्यापारी संघटना' व "पथारी व्यावसायिक असोसिएशन'चे पदाधिकारी उपस्थित होते. राजेश शिंदे, विठ्ठल मोगलाईकर, राजेश बारणे, किरण चौहान, नितीन पंडित, दुर्गेश नवले, शिरीष पटवर्धन, गणेश घम, रवींद्र रणधीर, अरविंद तांदळे, चंद्रकांत वाघमारे आणि व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया हे बैठकीत सहभागी होते.

पेशवेकाळात तुळशीबाग निर्माण करण्यात आली. नारूअप्पा खिरे यांनी येथील राम मंदिर उभारले. फुलांच्या दुकानापासून येथे व्यवसायास सुरवात झाली. कालांतराने व्यापाऱ्यांची संख्या वाढली. शहरातील महत्त्वाचे खरेदीचे ठिकाण म्हणून तुळशीबाग उदयास आली. अपुरी जागा आणि अनधिकृत फेरीवाले- व्यापाऱ्यांमुळे येथे अनेक समस्या निर्माण होतात.

तुळशीबाग परिसरात पार्किंगची समस्या मोठी आहे. वाहनतळ असले, तरी चुकीच्या पद्धतींमुळे त्याचा सुयोग्य वापर होत नाही. आर्यन वाहनतळात जायचा आणि यायचा मार्ग वेगळा होता, त्यातील एक मार्ग बंदच केल्याने एकाच मार्गावर दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होते.

बेकायदा फिरत्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणीही व्यापाऱ्यांनी केली. महापालिकेचे कर्मचारी कारवाईच्या वेळी आक्षेपार्ह वागणूक देतात. कारवाईच्या वेळी परवानाधारक दुकानात उपस्थित नसेल, तर त्या दुकानावर कारवाई केली जाते.

जिलब्या मारुती ते शनिपार दरम्यान नवीन पदपथ निर्माण केला जात आहे. त्यामुळे रस्त्याची जागा कमी होईल. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर दुहेरी वाहतुकीने कोंडी होते. त्यातच या नव्या पदपथाने भर पडेल. त्यामुळे हा पदपथ करू नये तसेच, दुकानाच्या समोर एक फूट जागा वापरण्याची परवानगी द्यावी, अशा मागण्या व्यापाऱ्यांनी या वेळी केल्या.

- पथारी व्यावसायिक असोसिएशनची स्थापना 1981, सदस्य संख्या 400 
- तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेची स्थापना 1985, सदस्य संख्या 275 
- परिसरातील एकूण व्यापाऱ्यांची संख्या 700

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com