इंदापूरच्या शेतकऱ्यांवर अस्मानीनंतर प्रशासनाच्या सुलतानीचे संकट

विनायक चांदगुडे
Thursday, 10 September 2020

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे पाच दिवसांपूर्वी जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांचे ऊस, मका, बाजरी यासारखी उभी पिके भुईसपाट झाली आहेत.

शेटफळगढे (पुणे) : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे पाच दिवसांपूर्वी जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांचे ऊस, मका, बाजरी यासारखी उभी पिके भुईसपाट झाली आहेत. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त पिकाचे प्रशासन पंचनामे करेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र पाच दिवसानंतरही अद्याप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याला सुरवात झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने या पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

म्हसोबावाडी गावच्या शिवारात मागील पाच वर्षांत पाऊस झाला नाही. मात्र, गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये उसाच्या पिकाची लागणी केल्या होत्या. हा ऊस गाळपाला जाण्याच्या तयारीत होता. अशातच सहा सप्टेंबरला संध्याकाळी झालेल्या मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या ऊस, मका, कडवळ, काढणीला आलेली बाजरीची पिके याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

कोरोनाबाधितांसाठी कॅशलेस सेवा, पण लूट सुरूच

याशिवाय साखर कारखाने सुरू होण्यास आणखी जवळपास अडीच महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे जमीनदोस्त झालेल्या उसाला उंदीर लागून ऊस वाळून अनेक शेतकऱ्यांचे आणखी आगामी काळात नुकसान होणार आहे. तसेच, ऊसतोड कामगारही ऊस तोडण्यास टाळाटाळ करणार आहेत. त्यामुळे म्हसोबावाडी येथील पिकांच्या नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे 

लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. अशातच वादळी वाऱ्यामुळे उसासारखी पिके पडल्याने या नुकसानीत भर पडली आहे. वरून आदेश अद्याप आले नाहीत, ते आल्यानंतर नुकसानीचे पंचनामे करू, असे सरकारी अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी या आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत, असे इंदापूर तालुक्‍यातील नरसोबावाडी येथील अंकुश पवार यांनी सांगितले. 

मागील वर्षभरापासून जोपासलेला जवळपास दोन एकर क्षेत्रावरील ऊस भुईसपाट झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. 
- मारुती पवार, शेतकरी, म्हसोबावाडी (ता. इंदापूर)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Punchnama of crop damage in Indapur taluka