विद्यार्थी हिताकरिता शाळेची वेळ कमी करण्याची मागणी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school

विद्यार्थी हिताकरिता शाळेची वेळ कमी करण्याची मागणी...

बारामती : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने व उष्णतेची लाट आली सल्याने त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने शाळेची वेळ सकाळी सात ते अकरा करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशवराव जाधव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे. बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी ही माहिती दिली.

या बाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोरोना काळात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढावे यासाठी एप्रिल महिन्यात देखील पूर्णवेळ शाळा भरवा असा आदेश शालेय शिक्षण विभागाने 27 मार्च रोजी काढला त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी 31 मार्च रोजी शाळा सकाळी साडेसात ते दुपारी 12 वाजून 55 मिनिटांपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले.

त्यानुसार दिनांक 1 एप्रिल पासून शाळा सकाळ सत्रात भरू लागली. पुढील दोन तीन दिवसातच शाळा सुटण्याची वेळ उन्हाचा तडाखा विचारात घेता विद्यार्थ्याच्या आरोग्यास धोकादायक आहे, ही बाब पुढे आली

शाळा सकाळी लवकर भरत असल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी शाळेत डबा न घेता येतात. शासनाने पोषण आहारासाठी धान्य उपलब्ध करून न दिल्याने मुलांना घरी जाईपर्यंत उपाशी राहावे लागत आहे. अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने मुलांना पिण्याचे पुरेसे पाणी उपलब्ध नाही. काही शाळांत पंखे नसल्याने विद्यार्थी उकाड्याने हैराण होत आहेत. बहुसंख्य शाळातील पाठ्यक्रम शिकवून झालेला आहे. त्यामुळे नाहक विद्यार्थ्याना एक वाजेपर्यंत वेठीस धरले जात आहे.

मिलिंद संगई, बारामती.

Web Title: Demand Reduction School Hours Benefit Students Heat Intensifies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..