Pune News
Pune Newssakal

Pune News : नियुक्तीपत्राच्या मागणीसाठी शिक्षकांची निदर्शने;महापालिका आयुक्त कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन,त्वरित पत्रे देण्याची मागणी

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या शिक्षकांना अद्यापही महापालिकेकडून नियुक्तीपत्र देण्यात न आल्यामुळे सोमवारी (ता. २७) राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षकांनी थेट महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
Published on

पुणे : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या शिक्षकांना अद्यापही महापालिकेकडून नियुक्तीपत्र देण्यात न आल्यामुळे सोमवारी (ता. २७) राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षकांनी थेट महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. भरती प्रक्रियेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना महापालिकेने त्वरित नियुक्तीपत्र द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

महापालिकेच्या शाळांसाठी पवित्र पोर्टलद्वारे मराठी माध्यमांसाठी २८७, इंग्रजी माध्यमातील शाळांसाठी १४० आणि उर्दू माध्यमातील शाळांसाठी २४ अशा एकूण ४४१ शिक्षकांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून संबंधित उमेदवारांची यादी लावली नाही.

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या संबंधित शिक्षकांनी पत्र, ईमेल, अधिकाऱ्यांच्या वारंवार भेटी घेऊनही त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सोमवारी दुपारीच शिक्षकांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले. बराच वेळ वाट पाहूनही आयुक्तांकडून भेट दिली जात नसल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात होता.

लहान मुलांसमवेत आलेल्या शिक्षिकाही अक्षरशः हतबल झाल्या होत्या. शिक्षकांनी आयुक्तांच्या भेटीचा आग्रह धरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून पोलिसांना बोलावण्यात आले. आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शिक्षकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले. आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पक्षाच्या शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शीतल कांडेकर यांनी आंदोलकांना पाठिंबा दिला.

जिल्हा परिषदेचे काही शिक्षक न्यायालयात गेले आहेत. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेता आलेला नाही.

-राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका.

नियुक्तीपत्र देण्याबाबत महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करूनही ते प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे सर्वजण न्याय मागण्यासाठी एकत्र आलो आहोत. महापालिकेने तत्काळ नियुक्तीपत्र द्यावे, ही मागणी आहे.

-हनुमंत रणदिवे, शिक्षक

आम्ही रात्रभर प्रवास करून सकाळी महापालिकेत आलो आहोत. दिवसभर अन्न, पाणी घेतलेले नाही. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आमचे गाऱ्हाणे मांडत आहोत. नियुक्तीपत्र देण्याची आमची मागणी आहे.

-एक शिक्षिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com