पुण्यात उपचारांसाठी डेंगीचे रुग्ण प्रतीक्षेत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dengue

‘सुरुवातीला ताप आला. त्यामुळे डेंगीची टेस्ट केली. ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी सुरवातीला औषधे दिली. पण, ताप कमी होईना. प्लेटलेट्स वेगाने कमी होऊ लागल्या.

पुण्यात उपचारांसाठी डेंगीचे रुग्ण प्रतीक्षेत!

पुणे - ‘माझ्या १२ वर्षांच्या मुलीला ताप आला. तिला डेंगी झाल्याचे निदान झाले. दोन दिवस औषधे देऊनही ताप कमी होत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. पण, हडपसर येथील रुग्णालयात जागा मिळता मिळत नाही...’ मुलीला दाखल करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या रूपाली सांगत होत्या. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरील काळजी स्पष्ट दिसत होती.

‘सुरुवातीला ताप आला. त्यामुळे डेंगीची टेस्ट केली. ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी सुरवातीला औषधे दिली. पण, ताप कमी होईना. प्लेटलेट्स वेगाने कमी होऊ लागल्या. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने रुग्णालयात दाखल करायला सांगितले. आतापर्यंत चार रुग्णालयांमध्ये जाऊन आले. एकाही रुग्णालयात जागा नाही. या रुग्णालयात जागा मिळावी ही अपेक्षा आहे,’ डोळ्यांत पाणी आणून रूपाली बोलत होत्या. त्या वेळी रात्रीचे अकरा वाजले होते.

यादीत नाव नोंदवावे लागते

कोरोना काळात रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून घ्यायला जागा मिळत नव्हती. तितकी तीव्रता नसली तरीही डेंगीच्या रुग्णांना उपचारांसाठी दोन ते तीन रुग्णालयांमध्ये फिरावे लागते. सध्या स्वाइन फ्ल्यूचे रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच, दिवाळीपूर्वी नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढलेले असते. यामुळे शहरातील काही प्रमुख रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल होण्यापूर्वी प्रतीक्षा यादीत नाव नोंदवावे लागत असल्याची माहिती पुढे आली.

पुण्यात चार महिन्यांत वाढला डेंगी

पुण्यात जानेवारीपासून आतापर्यंत डेंगीच्या ४५० रुग्णांना डेंगी झाल्याचे निश्चित निदान झाले. तर, संशयित रुग्णांची संख्या चार हजार ३० पर्यंत वाढली. निश्चित निदान झालेल्यांमध्ये ६८ टक्के रुग्ण (३०७) गेल्या चार महिन्यांमधील आहेत. त्यातही सर्वाधिक रुग्णांची नोंद सप्टेंबरमध्ये (१२१) झाली.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • अचानक वाढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागे दुखणे

  • डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी

  • रक्तस्त्रावित डेंगी ताप ही गंभीर अवस्था आहे

  • क्वचित रुग्णांमध्ये त्वचेवर पुरळ दिसतात

रुग्णसंख्यावाढीची कारणे

1) शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना उद्रेक सुरू होता. या काळात डेंगीचा रुग्णांची संख्या अत्यल्प होती. या वर्षी कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी नोंदविले.

2) शहरात या वर्षी पावसाळा लांबला आहे. त्यामुळे पावसाच्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहेत.

3) ऑक्टोबरच्या सुरवातीला उन्हाचा चटका वाढला होता. त्यानंतर ढगाळ वातावरण आणि आता पावसाळी हवा. अशा विषम वातावरणामुळे डेंगीच्या डासांच्या पैदास वाढते.

पुणे शहरात डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. हे डेंगीच्या तापाचे रुग्ण आहेत. त्यात डेंगी हेमोरेजिक फिव्हरचे प्रमाण अत्यल्प आहे. डेंगी शॉक सिंड्रोमच्या रुग्णांची नोंद झाली नाही. त्यामुळे डेंगीमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. डेंगीच्या तापाचे रुग्ण योग्य निदान आणि प्रभावी औषधोपचाराने तीन दिवसांमध्ये बरे होत आहेत. सध्या पडत असणाऱ्या पावसामुळे डेंगीच्या उद्रेकास पोषक वातावरण मिळाले आहे.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका