शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी महाविद्यालयांमध्ये कक्ष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे नष्ट झाली असतील, तर ती पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने स्वतंत्र कक्ष सुरू करावेत, अशा सूचना उच्च शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.

पुणे - सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे नष्ट झाली असतील, तर ती पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने स्वतंत्र कक्ष सुरू करावेत, अशा सूचना उच्च शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.

याबाबत उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी "सकाळ'ला सांगितले, की दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुमारे पंधरा महाविद्यालयांना पुराचा फटका बसला आहे. तेथील कागदपत्रे नष्ट झाली आहेत. यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रेही नष्ट झाली आहेत. त्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी आवश्‍यकता भासल्यास ही कागदपत्रे उपलब्ध झाली पाहिजेत. ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चकरा माराव्या लागू नयेत यासाठी महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

'विद्यार्थ्यांनी गुणपत्रक, ट्रान्सफर सर्टिफिकेट यासह शैक्षणिक प्रमाणपत्रे नष्ट झाली असल्यास जवळच्या कक्षात जाऊन अर्ज करायचा आहे. या कक्षाने सर्व अर्ज एकत्र करून ते संबंधित विद्यापीठांकडे पाठवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे मिळवून द्यायची आहेत. अनेक कागदपत्रे ही तालुका स्तरावर सेतू कार्यालयात असतात. अशा स्थितीत या कक्षाने सेतू कार्यालयांशी संपर्क करून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करायची आहे,'' असे डॉ. माने यांनी सांगितले.

'कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांबरोबर उर्वरित महाराष्ट्रातील महाविद्यालयांनीदेखील संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून असा कक्ष सुरू करावा. त्यामार्फत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळवून देण्याची व्यवस्था निर्माण करावी. शैक्षणिक प्रमाणपत्रे हरविल्यानंतर विद्यार्थ्यांना हेलपाटे मारण्याचा त्रास होऊ नये, अशी खबरदारी महाविद्यालयांनी घ्यावी,'' असे डॉ. माने यांनी सूचित केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Department in colleges for educational certificate for Flood Effected