संत सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा रंगला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा रंगला

संत सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा रंगला

सासवड : टाळ - मृदंगाचा निनाद आणि निवडक दिंड्या - वारकरी यांची उत्साही उपस्थिती.. ढगाळ वातावरण व मंद वाऱयाच्या झुळका अंगावर झेलत... लोकरंग व भक्तीरंगात श्री. संत सोपानदेवांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरीच्या आषाढवारीचा प्रस्थान सोहळा भक्तीमय झाला. खरे तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीतील लाखभर वारकरी सोपानदेवांना पंढरीकडे निरोप देण्यासाठी असतात, मात्र यंदा दुसरे वर्ष असे की.. कोरोना नियम पाळून वारीला मुरड घालावी लागली आहे.

प्रस्थान सोहळा ज्येष्ठ वद्य द्वादशी दिवशी (6 जुलै) सासवडला देऊळवाड्यात मंदिरात व देऊळवाड्यात फुलांची सजावट केली होती. समाधीवर पहाटे स्नान पूजा, अभिषेक झाला. सारा उत्साह व उत्सवी थाट असला तरी कोरोना नियम पाळून सारे दरवाजे बंदीस्त ठेवून पोलीस बंदोबस्तात प्रस्थान सोहळा रंगला. या वर्षीही शासन आदेशानुसार पायी वारीला परवानगी नसल्यामुळे गतवर्षी प्रमाणे बसमधूनच निवडक वारकरी श्री.संत सोपानदेवांच्या पादुका घेऊन आषाढवारी करतील. त्यासाठीचा प्रस्थान सोहळा काल (6 जुलै) सासवडला देऊळवाड्यात झाला. असे संत सोपानदेव समाधी मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख अॅड. त्रिगुण गोपाळ गोसावी यांनी सांगितले. यावेळी आळंदीच्या संत ज्ञानेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, प्रांत प्रमोद गायकवाड, तहसिलदार रुपाली सरनोबत, डीवायएसपी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, राहुल घुगे, गट विकास अधिकारी अमर माने, नगरसेवक अजित जगताप, प्रविण भोंडे, सुनिता कोलते, विश्वजित आनंदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्रींच्या पालखीचे प्रस्थान काल (ता. 6) दुपारी 4 ते साडेपाच दरम्यान देऊळवाड्यात झाले. मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मंदिरातच विसव्याला थांबली. 6 जुलै ते 18 जुलै पालखीचा मुक्काम समाधी मंदिरात सासवडलाच असेल व या दरम्यान नित्य उपचार म्हणजे काकड आरती, भजन, हरिपाठ, कीर्तन सेवा, शेज आरती व जागर मंदिरातच होईल. शक्यतो वारी वाटचालीमध्ये ज्या दिंड्यांच्या कीर्तन सेवा व इतर सेवा आहेत. त्यांच्या कडून या सेवा घडतील. त्यानंतर म्हणजे आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी म्हणजे 19 जुलै रोजी शासनाकडून पुरविलेल्या दोन एसटी बसेसमधून श्रींच्या पादुका पंढरीकडे प्रत्यक्ष प्रस्थान (वाटचाल) करतील. एसटी बसेस फुलांनी सजवण्याचे काम गेल्यावर्षी प्रमाणे संत सोपानकाका बँक करणार आहे. बसमधून सोबत चाळीस वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात व नामघोष करीत पादुकांना सोबत घेऊन जातील. वाखरी येथे पोहोचून मग वाखरी ते पंढरपूर पायी वारी करून रात्री प्रदक्षिणा मार्ग पंढरपूर येथे संत सोपानकाका मठात रात्रीचा मुक्काम होईल. आषाढ शुद्ध पौर्णिमेपर्यंत मुक्काम येथेच असेल. एकादशी ते पौर्णिमा पंढरपूर येथे दर वर्षीप्रमाणे नित्यविधी, पूजा होतील. पौर्णिमेला काला झाल्यानंतर परत सासवडकडे परतीचा प्रवास सुरू होईल., अशी माहिती प्रस्थानानिमित्त विश्वस्त अॅड. गोपाळ गोसावी यांच्याकडून दिली गेली.

सोहळाप्रमुख त्रिगुण गोपाळ गोसावी यानिमित्ताने म्हणाले, ''कोरोनाचे सगळे नियम काटेकोरपणे पालन करून ही संत सोपानदेवांची पंढरीची आषाढी वारी प्रतिकात्मक व प्रातिनिधिक स्वरूपात पार पाडणार आहोत. पांडुरंगाला साकडे घालणार आहोत की, महामारीचे संकट लवकरात लवकर संपव व तुझ्या भेटीसाठी व दर्शनासाठी पुढे तरी व्याकूळ ठेऊ नको.''

Web Title: Departure Ceremony Of Saint Sopandev Palkhi From

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top