esakal | उपमुख्यमंत्री अजित पवार आज सिंहगडावर IPune
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सिंहगडावर

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : सिंहगड पर्यटनाचा ऐतिहासिक दर्जा वाढविणे, ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन, गडाचे पावित्र्य जपत, शिवप्रेमी, निसर्गप्रेमी पर्यटकांना चांगल्या पर्यावरण पूरक सुविधा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार हे शुक्रवार, दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता सिंहगडास भेट देणार आहे. पुणे वन विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.

“माझा सिंहगड- माझा अभिमान”, अंर्तगत पुणे वन विभागाने वन्यजीव सप्ताह (१- ७ ऑक्टोबर), गडावर पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण (गाईड ट्रेनिंग), शीघ्र कृती दल, वृक्षारोपण या कार्यक्रमांची सुरवात या निमिताने होत आहे. यावेळी, वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे वनवृत्त सुजय दोडल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त सुहास दिवसे, पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील, पुरातत्वचे उपसंचालक विलास वाहणे, पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद स्थानिक लोकप्रतिनिधी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती उपवनसंरक्षक (प्रादेशिक) राहूल पाटील यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली.

हेही वाचा: वारंवार रस्ते कसे अडवले जाऊ शकतात? SCचा केंद्राला सवाल

उपमुख्यमंत्री पवार सिंहगडावरील ऐतिहासिक ठिकाणांना भेटी व परिसर पाहणी करतील. त्या नंतर वन विभागाच्या कार्यक्रमांची सुरवात या निमिताने केली जाणार आहे. खासदार सुळे सिंहगडावर यांनी १५ दिवसापूर्वी भेट दिली होती. वन विभागाला सिंहगडाचा सर्वांगीण विकास आराखडा करण्याचे सूचना दिल्या होत्या. आराखड्यातील कामांचे प्रामुख्याने एक, तीन व पाच वर्षात पूर्ण होतील अशी वर्गीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर वन विभागाच्या वतीने मागील आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांना आराखड्याचे सादरीकरण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.

दरम्यान, सिंहगड परिसरातील अवसरवाडी, घेरा सिंहगड, मोरदरी, कल्याण, पेठ, कोळीवाडा (सिंहगड), आतकरवाडी (सिंहगड), गोळेवाडी (डोणजे), कोंढणपूर गावातील नागरिक आहेत. हे सर्वजण हॉटेल व्यावसायिक, दही- ताक, सरबत, वस्तू विक्रेते, प्रवासी वाहतूक करणारे चालक- मालक हे सर्वजण स्थानिक आहेत. यावर सुमारे ४००- ४५० कुटुंब अवलंबून आहेत. गडावरील सर्व हॉटेल व्यावसायिक यांचे जागेनुसार दोन ठिकाणी नियोजन केले जात आहे.

सिंहगड कधी सुरू होणार

कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने शाळा, मंदिरे उघडण्यासंदर्भात राज्य सरकरने निर्णय घेतले आहेत. कोरोनाचे नियम पाळून गड, किल्ले सुरू करा. सिंहगड पर्यटकांसाठी सुरू करावा. अशी मागणी, ग्रामस्थ व पर्यटकांच्याकडून होत आहे. मार्च २०२० पासून कोरोनामुळे सिंहगड पर्यटकांसाठी बंद आहे. त्याच्या अगोदर दोन- तीन वर्षे घाट रस्ता तयार करणे, दरड प्रतिबंध जाळ्या बसविणे, दरड पडण्याची भीतीपोटी वेळोवेळी महिने- महिने बंद होता. परिणामी गडावरील विक्रेते यांचे चार- पाच वर्षात उत्पन्न घटले आहे.

“सिंहगड बंद असल्याने गडावरील सर्व हॉटेल, दही ताक, सरबत, विविध वस्तू विकणारे विक्रेते, प्रवासी वाहतूक लोकांचे उत्पन्न ठप्प झाले आहे. शेती असणारे शेतात काम करतात. काही जण मोल मजुरी, शेतात मजुरीसाठी जात आहेत. आणि जीवन जगत आहेत. कोरोनाची नियमावली पाळून सिंहगड पर्यटकांसाठी सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी होत आहे. आम्ही ग्रामपंचायत मार्फत गड सुरू करण्याबाबत निवेदन देणार आहे.”

-मोनिका पढेर, सरपंच घेरा सिंहगड

loading image
go to top