पवारसाहेब चारवेळा मुख्यमंत्री आणि मी...; अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 January 2020

बारामतीत कर्जमाफी 120 कोटींची  

माळेगाव : पवारसाहेब चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मीही चारवेळा उपमुख्यमंत्री झालो, हे वाक्य अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात वापरले आणि सभागृहात एक हास्यकल्लोळ उडाला. अर्थात सभेचा ताण हलका करण्यासाठी असे काही विनोद करावे लागतात, अशा शब्दांत पवार यांनी बारामतीकरांसमोर दोन दिवसांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत आपली भावना स्पष्ट केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवर्षिक निवडणुकीचा कार्यक्रम आजपासून अमलात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर बारामती येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

ते म्हणाले, पवारसाहेब आणि मी राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी पदांवर अनेक वर्ष काम केले आहे. परंतु मिळालेली सत्ता ही लोक हितासाठी वापरली, मात्र भाजप सरकारने लोकांना खूप वाईट वागणूक देत छळले. भाजप सरकारने राजकारण बाजूला ठेवून बारामती तालुक्यासह जिल्ह्यात पाहिजे तेवढा विकास निधी देणे आपेक्षित होते. परंतु सत्तेचा गैरवापर करून या जिल्ह्यातील लोकांना वागविले.

तत्कालीन सहकारमंत्र्यांनी तर कहरच केला. माळेगाव कारखान्यात लोकशाही पद्धतीने निवडणून आलेले चार संचालक चुकीच्यापद्धतीने अपात्र करीत घरी घालविले. मनमानीपद्धीतीने आपल्या विचाराच्या लोकांना कारखान्याचे संचालक केले. चार महिन्याला एक संचालक बदलण्याची ही पद्धत आजवर कोठे घडली नाही, ती माळेगावमध्ये सहकार मंत्र्यांच्या आधाराने घडली. हे बरोबर नाही.

''महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार आले आहे. हे सरकार सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थ व नियोजन खाते बारामतीकरांना मिळाले आहे. त्यामुळे कर्जमाफीसह नियमित कर्ज फेडणाऱ्यांना न्याय देवून निश्चितपणे विकास कामांना पैसा कमी पडणार नाही, याची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. सरकारमध्ये माझ्यावर मोठी जबाबदारी आली असून, आगामी काळात मला अर्थसंकल्प सादर करायचा आहे. शेतकरी, शेतमजूरांपासून उद्योग व्यावसायिकांना केंद्रबिंदू ठेवून मी यापुढे काम करणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. 

बारामतीत कर्जमाफी 120 कोटींची  

बारामती तालुक्यात कर्जमाफीच्या माध्यमातून 120 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. ग्रामीण भागात शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण करायचे आहे. नीरा डावा कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरेसे पाणी देण्याचा माझा प्रयत्न राहिल. बारामतीत वैद्यकीय महाविद्यालयात, गॅस पाईपलाईन, नवीन पंचायत समिती कार्य़ालयाच्या इमारत, पोलिस वसाहत, शहरातील उद्यानांसाठी आवश्यक तेवढा निधी शासन व उद्योगपतींच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहिल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar talked about Politics