राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणणार; उपमुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

पालकमंत्री पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हवेली तालुक्यातील शेवाळेवाडी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे ऑनलाईन कळ दाबून उद्घाटन केले.

पुणे : कोरोना विषाणूशी सामना करीत राज्याची विस्कटलेली आर्थिक विकासाची घडी पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पालकमंत्री पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हवेली तालुक्यातील शेवाळेवाडी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे ऑनलाईन कळ दाबून उद्घाटन केले. शेवाळेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने शापुरजी पालनजी आणि कंपनी यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी, लोकवर्गणी, ग्रामनिधी यांच्या माध्यमातून दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. यासाठी सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या रस्त्याला ‘लोकनेते शरदचंद्रजी पवार मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेश मंडळाच्या दर्शनाबाबत उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पोलिसांना दिले आदेश

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ‘एकात्मिक पाणीपुरवठा’ योजना आणि ग्रामनिधी यांच्या माध्यमातून तीन लाख लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले असून, यासाठी ३७ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या ‘जनसुविधा योजने’अंतर्गत शेवाळेवाडी-मांजरी बुद्रुक हद्दीलगत असलेल्या स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी पाच लाख ६० हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सरपंच अशोक शिंदे, उपसरपंच अमोल जगताप, विक्रम शेवाळे या वेळी उपस्थित होते. तसेच, माजी आमदार जगन्नाथ बाप्पू शेवाळे, आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप घुले, सदस्या अर्चना कामठे, हवेली पंचायत समितीचे सदस्य दिनकर बापू हरपळे, ग्रामसेवक एम.पी.चव्हाण, ग्रामस्थ, कर्मचारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar made statement about states economic situation