जम्बो रुग्णालयातील तक्रारींवर उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली उत्तरे; वाचा काय म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

गेल्या आठवड्याभरात पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर जम्बो कोविड सेंटरचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

पुणे - गेल्या आठवड्याभरात पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर जम्बो कोविड सेंटरचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल सांगताना अजित पवार म्हणाले की, पुण्यातले 25 ते 30 टक्के नागरिक मास्क वापरत नाहीत. लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचा अहवाल सोमवारी येईल असंही त्यांनी सांगितलं.

ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा फक्त पुण्यातच नाही तर राज्यातील इतर काही भागातही आहे. जम्बो रुग्णालयातील सुविधांबाबत विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूप्रकऱणी चौकशीची जबाबदारी ससूनच्या डीनकडे सोपवली असल्याचं अजित पवार म्हणाले. या प्रकरणात दोषी कोण? नेमकं काय घडलं याबाबतचा अहवाल ससूनचे डीन देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 

जम्बो रुग्णालयाबाबत तक्रारी येत असून त्याबद्दल विचारले असता अजित पवार यांनी काही जम्बो रुग्णालयात सर्व सुरळीत असल्याचं सांगितलं. पुण्यातील जम्बो रुग्णालयाबद्दल तक्रार आल्या. तिथं अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून नीट जमत नसेल तर संबंधितांवर कारवाई करा. त्याठिकाणी नवीन टीम आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नातेवाईकांनी रुग्णांची माहिती मिळत नाही तर...
नातेवाईकांना त्यांच्या रुग्णांची माहिती मिळत नसल्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत. त्यासाठी जम्बो रुग्णालयात कॅमेरे आणि स्क्रीन लावावी असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यामुळे नातेवाइकांना त्यांचा रुग्ण कुठं आहे, कसा आहे हे समजेल. जम्बोमध्ये सगळेच कोरोना पेशंट असतात. अशा ठिकाणी नातेवाइकांनी जाणं धोक्याचं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी अशी सोय करायला हवी असे अजित पवार म्हणाले. 

अँब्युलन्सची माहिती एका ठिकाणी मिळावी
रुग्णाला बेड मिळत नाही अशी तक्रार आहे त्याबद्दल सांगताना अजित पवार म्हणाले की, सध्या किती बेड शिल्लक आहेत? यात साधे किती आणि ऑक्सिजन किती याची माहिती घेत आहे. अँब्युलन्ससाठी वेगवेगळ्या संघटना, महानगरपालिका, आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या अँब्युलन्सची माहिती एकत्र मिळण्यासाठी व्यवस्था केली जात आहे.  सोमवारपासून अधिवेशन सुरु होणार आहे. त्यामध्ये आरोग्य विभागाला आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी काय करावं लागेल याची दखल घेतली जाईल. 

थेट आयुक्तांनाकडूनच घेतलं उत्तर
जम्बो रुग्णालयातील नातेवाइकांकडून पैसे मागितले जातात. याबद्दल विचारले असता पत्रकार परिषदेतच अजित पवारांनी आयुक्तांना थेट प्रश्न विचारला. यावर असा काही प्रकार होत नसल्याचं आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी आयुक्तांचे काम कसे चालते, ते किती वेळ काम करतात हे सांगितलं. आयुक्त विक्रम कुमार सकाळपासून जम्बो रुग्णालयाच्या उभारणीवेळी उपस्थित होते. दिवसरात्र या संकटाच्या काळात नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्या यासाठी झटत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

अचानक रुग्णसंख्या वाढली
जम्बो रुग्णालयात बेडसंख्या पुरेशी होती. सुरुवातीला रुग्णांच्या संख्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्यापेक्षा अधिक वेगाने रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे व्यवस्थेवर ताण आला. त्याआधी उभारणीवेळी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. पावसामुळे चिखल झाला होता. याचा परिणाम उभारणीमध्ये अनेक अडचणी आल्या. यासाठी अधिकारी, महानगरपालिकेचे कर्मचारी काम करत होते. ससूनमध्ये टप्प्याटप्प्याने कोरोनासाठी पूर्ण इमारत वापरात घेतली. तिथंही सुविधा असून रुग्णांची वाढ झाल्यानंतर अडचणी आल्या तसंच जम्बो रुग्णालयाबाबत झाल्याचं अजित पवार म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deputy cm ajit pawar press conference after jumbo covid center visit