

पुणे - आम्हाला सर्वसाधारण सभेत बोलण्याची संधी मिळत नाही, प्रभागातील कामे मार्गी लागत नाहीत, नागरिकांचा रोष ओढावून घ्यावा लागत आहे. प्रमुख पदाधिकारी अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असल्याने आम्हाला हे अधिकारी दाद देत नाहीत. सत्ताधारी म्हणून आपला प्रशासनावर अंकुशच नाही. सर्वांना समान वागणूक द्या, चार-चार वेळा निवडून येऊनही आमचे म्हणणे कोणी ऐकून घेत नाही, आमचा मान राखला जात नाही अशा शब्दात भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेतील कारभाऱ्यांची नावे न घेता आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवली. हे सर्व ऐकून ‘गेल्या सहा महिन्यात आमच्या मदतीने काही चांगली कामे केली आहेत, ती देखील बैठकीत मांडा’ अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी केली.