वाहतूक कमी होऊनही द्रुतगतीवर वाढले मृत्यू

वाहतूक कमी होऊनही द्रुतगतीवर वाढले मृत्यू

पुणे - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनांची गर्दी सुमारे 10 हजारांनी कमी झालेली असली तरी, भरधाव वाहनांमुळे अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या तुलनेत वाढती आहे. महामार्ग पोलिसांकडे झालेल्या अपघातांच्या नोंदीतून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महामार्गावरील भरधाव वाहनांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

राज्यात 25 मार्चपासून कोरोनाचा लॉकडाउन लागू झाला. मात्र, त्यापूर्वी आठवडाभर द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचे प्रमाण घटले होते. दरम्यानच्या काळात अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांची तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांची वाहतूक द्रुतगतीवरून सुरू होती. जूनपासून टप्प्याटप्प्याने या मार्गाचा प्रवास करून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढू लागली. मात्र, वाहनांची संख्या वाढली, त्या प्रमाणात अपघातांचेही प्रमाण वाढू लागल्याचे दिसून आले आहे. एरवी अमृतांजन पुलाजवळ वाहतुकीची कोंडी होत असे. आता तो पूल पाडला आहे. मात्र, तेथील चढ आणि उतार वाहनांसाठी जिकिरीचा झाला आहे. त्याचप्रमाणे द्रुतगतीवरून तुलनेने रात्री वाहतूक जास्त होते. त्यात जड वाहनांचा समावेश आहे. रात्रीच्यावेळी दृश्‍यमानता कमी असते. तसेच, डावीकडून ओव्हरटेक करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेही वाहन डावीकडे सर्व्हिस रस्त्यावरून घसरून अपघात होतात. जड वाहनांकडून लेनच्या नियमांचे उल्लंघन होते. परिणामी लहान-मोठे अपघात होतात, असे निरीक्षण द्रुतगतीवर बंदोबस्ताचे काम करणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या मर्यादित संख्येने उड्डाणे होत आहेत. ती नियमितपणे सुरू झाल्यावर वाहतूक वाढेल. सध्या वाहतूक कमी असल्यामुळे चालकांना रस्ता मोकळा मिळतो. त्यामुळेही चालक वाहनांचा वेग वाढवितात. त्यामुळे ताशी 150 किलोमीटर वेगाने अनेक वाहने जात असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले. 

रस्ता सल्लागार विकास ठकार म्हणाले, ""आपल्याकडील रस्ते ताशी 150 ते 170 किलोमीटर वेगाने वाहन चालविण्यासाठी तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहने भरधाव झाल्यास टायर फुटून अपघात होतात. तसेच लेनच्या शिस्तीचेही पालन होण्याची गरज आहे. भरधाव वाहनांवरील कारवाईत महामार्ग पोलिसांनी सातत्य ठेवल्यास अपघातांची संख्या निश्‍चित कमी होऊ शकेल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मानसिकता बदलण्याची गरज 
अक्षयमार्ग फाउंडेशनचे संचालक तन्मय पेंडसे म्हणाले, ""वाहतूक कमी असल्यामुळे वाहनचालक वेगाने गाड्या चालवीत असल्याचे दिसून आले आहे. त्यातच सहा महिने बहुतांश वाहनचालक घरातच होते. त्यामुळे द्रुतगतीवर वाहन वेगाने चालविण्याची त्यांची मानसिकता होते. त्यातून अपघातांना निमंत्रण मिळते. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी, वाहनचालकांनी त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.'' 

लेनची शिस्त, वेगमर्यादेचे पालन सर्वच वाहनचालकांनी करावे, असा महामार्ग पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी प्रबोधन, जागरूकतेवर भर दिला जात आहे. ज्या ठिकाणी धोकादायक वळणे, तीव्र चढ-उतार आहे, त्या ठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात करून अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. 
- संजय जाधव, अधीक्षक, महामार्ग पोलिस 

94 किलोमीटर  द्रुतगती मार्गाची लांबी 
- 30 हजार (कोरोनापूर्वी ः दोन्ही बाजूने) 
- 18 ते 20 हजार (सध्याची वाहतूक) 


द्रुतगतीवरील वाहनांची वर्दळ 

अपघातांची संख्या प्राणांकित अपघात मृत्युमुखी एकूण अपघात
जानेवारी ते सप्टेंबर 2019 50 58 232
जानेवारी ते सप्टेंबर 2020 43 48 103


असे टळतील अपघात 
- द्रुतगतीवरील ताशी 80 किलोमीटरच्या वेगमर्यादेचे पालन करणे 
- लेनची शिस्त पाळणे (जड वाहने डावीकडे, हलकी वाहने मध्यभागी आणि उजवी लेन ओव्हरटेक करण्यासाठी) 
- द्रुतगतीवर वाहन चालविण्यापूर्वी वाहनाची पुरेशी देखभाल-दुरुस्ती झाली आहे का, मागचे पुढचे लाइट सुरू आहेत का, याची खात्री करणे 
- डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे टाळण्याची गरज 
- पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com